निलेश राणेंचा प्रशासनाला पुन्हा इशारा ; आज ४८ तास संपल्यानंतर…
रत्नागिरीतील घटनेमुळे निलेश राणे आक्रमक ; उद्या निघणाऱ्या सकल हिंदू समाजाच्या भव्य मोर्चात सहभागी होणार
मालवण | कुणाल मांजरेकर
रत्नागिरी नजिक मिरजोळे एमआयडीसी येथे गुरुवारी संध्याकाळी गो वंशाचे मुंडके सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या विरोधात हिंदू समाज आक्रमक झाला असून भाजपाचे नेते निलेश राणे यांनी यातील दोषींना अटक करण्यासाठी प्रशासनाला कालच अल्टीमेटम दिला होता. आज निलेश राणे यांनी आपल्या “एक्स” या सोशल मीडिया पुन्हा एकदा पोस्ट करून आमची मागणी प्रशासनाने दुर्लक्षित करू नये, आज ४८ तास संपल्यानंतर आरोपी पकडले गेले नाहीत तर त्यांचे परिणाम दिसून येतीलच, असा इशारा दिला आहे.
रत्नागिरी नजीकच्या मिरजोळे एमआयडीसीतील प्लॉट क्रमांक 44 वर गुरुवारी संध्याकाळी गोवंशाचे एक मुंडके रस्त्यावर पडलेले दिसून आले. त्यानंतर रत्नागिरीतील हिंदू बांधव आक्रमक झाले. दोषींवर कारवाई झाली पाहिजे आणि हे प्रकार तात्काळ बंद झाले पाहिजेत अशी मागणी करत शुक्रवारी पहाटेपर्यंत रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात हजारो रत्नागिरीकर एकत्र आले होते. या सगळ्या प्रकारची दखल भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांनी घेत मिरजोळे येथे झालेला हा प्रकार मनाला वेदना देणार आहे. पोलिसांना सगळे मार्ग माहिती आहेत, हे प्रकार कोण करत माहिती आहे, मग इतके दिवस हे प्रकार थांबवले का जात नाहीत. त्यावर कारवाई का होत नाही असा सवाल करत या आठवडा – दहा दिवसात हे प्रकार थांबवले नाहीत तर गाड्या आम्ही थांबवणार, त्या फोडणार आणि जिथे ही कत्तल चालते ते स्पॉट आम्ही उध्वस्त करणार. पोलिसांनी तात्काळ कडक कारवाई केली नाही तर गो मातेच्या रक्षणासाठी आम्ही कायदा हातात घेणार असा थेट इशारा निलेश राणे यांनी दिला होता.
आज त्यांनी पुन्हा एकदा एक्स वर पोस्ट करून “रत्नागिरीतील गो वंश हत्येच्या घटनेनंतर हिंदू बांधव आक्रमक झाला आहे. आरोपी पकडलेच गेले पाहिजे ही आमची मागणी आहे. ही गोष्ट प्रशासनाने दुर्लक्षित करु नये. आज ४८ तास संपल्यानंतर जर आरोपी पकडले गेले नाहीत तर त्याचे परिणाम दिसून येतीलच. उद्या सकाळी रत्नागिरीत सकल हिंदू समाजाचा भव्य मोर्चा निघणारच! त्यात मिही सहभागी होतोय, तुम्हीही व्हा.” असे म्हटले आहे.