३६ मतं मिळवता येत नाहीत, आणि विधानसभेच्या गप्पा मारतोय…
सतीश सावंत यांच्या पराभवानंतर केंद्रीयमंत्री नारायण राणेंची बोचरी टीका
कुणाल मांजरेकर
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील भाजपच्या विजयानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाविकास आघाडीचे पॅनेल प्रमुख तथा शिवसेना नेते सतीश सावंत यांच्यावर सडकून टीका केली आहे. पराभवानंतर तरी सतीश सावंत यांनी स्वतःची लायकी ओळखावी. याला ३६ मतं मिळत नाहीत आणि हा विधानसभेच्या गप्पा मारतो, अशा शब्दात राणेंनी सतीश सावंत यांची खिल्ली उडवली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत भाजपाने विजय मिळविल्यानंतर मुंबईत असलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दुपारी हेलिकॉप्टरने कणकवली गाठून विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना नारायण राणे यांनी मतदारांचे आभार मानले. कोकणातील देवदेवता आणि जनतेच्या आशीर्वादामुळे जिल्हा बँकेत भाजपाची सत्ता आली आहे. या विजयाचे श्रेय भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांना आहे. नितेश राणे, निलेश राणे, राजन तेली यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे हा विजय संपादन करता आला आहे. ज्याला निवडून यायची अक्कल आहे, त्याचाच याठिकाणी विजय झाल्याचे नारायण राणे यांनी सांगून आजचा विजय हा आमच्यासाठी मोठा आहे, असे सांगून येणाऱ्या विधानसभा, लोकसभा निवडणुकीतही येथील जनता नको असलेल्या चेहऱ्यांना येथून कायमची हद्दपार करेल, असे ते म्हणाले.