संतोष परब हल्ला नाट्याला कलाटणी ; पोलिसांची खुद्द नारायण राणेंना नोटीस
आ. नितेश राणेंचा ठावठिकाणा सांगण्यासाठी पोलीस ठाण्यात हजर राहण्याचं फर्मान
केंद्रीय मंत्र्याना मिळालेल्या नोटीसीमुळे खळबळ : ना. राणे पोलीस ठाण्यात हजर राहणार का ?
कुणाल मांजरेकर
शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्या प्रकरणात आमदार नितेश राणे यांच्या अटकेच्या शक्यतेने राज्यात खळबळ उडाली असताना आता या प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे. दस्तुरखुद्द केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना कणकवली पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस पोलिसांनी बजावल्याने राजकिय गोटात खळबळ उडाली आहे. दरम्यान, ना. राणेंनी पडवे येथील हॉस्पिटलमध्ये ही नोटीस न स्वीकारल्याने राणेंच्या कणकवली येथील निवासस्थाना बाहेर पोलिसानी ही नोटीस चिकटवली. त्यामुळे आता नारायण राणे पोलिसांसमोर हजर होणार का ? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
शिवसेना नेते तथा सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असलेल्या संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे यांच्या अटकेचा वॉरंट निघाला आहे. कणकवली पोलिसांकडून नितेश राणे यांचा शोध सुरू आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत नितेश राणे कुठे आहेत, असा सवाल विचारण्यात आला होता. तेव्हा त्यांनी हे सांगायला आम्ही मूर्ख आहोत का, असं उत्तर दिलं होतं. याबाबत शिवसेनेकडून विधानसभा संघटक सचिन सावंत आणि युवासेनेचे जिल्हा समन्वयक राजू राठोड यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यामध्ये नारायण राणे यांना नितेश राणे आणि गोट्या सावंत कुठे आहेत ते माहीत असून तेच या आरोपींना पोलिसांपासून आणि अटकेपासून वाचवित असल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यानुसार पोलिसांनी राणेंना नोटीस बजावली असून, त्यांच्याकडून नितेश राणेंची माहिती घेण्यात येणार आहे. ना. राणेंना नोटीस देण्यासाठी पोलीस त्यांच्या पडवे येथील हॉस्पिटलमध्ये गेले असता त्यांनी नोटीस स्वीकारण्यास नकार दिल्याने ही नोटीस त्यांच्या कणकवली येथील निवासस्थाना बाहेर चिकटवण्यात आली आहे. त्यामुळे नारायण राणे आता पोलीस ठाण्यात हजर होणार का ? हे पाहणे औत्सुक्याचे राहणार आहे.
नोटीस काढून टाकली
नारायण राणेंच्या घरावर पोलिसांनी चिकटवलेली नोटीस राणेंच्या घरातील कर्मचाऱ्याने काढून टाकली आहे. ही नोटीस त्याने आतमध्ये नेली आहे. त्यामुळे आता काय होणार ? राणे पोलीस ठाण्यात हजर होणार का? याची उत्सुकता आहे.त