समीर म्हाडगुत, नरेंद्र कोलतेंसह सहा जणांना जिल्हा पत्रकार संघाचे पुरस्कार

अजय सावंत, नितीन कदम, विजय देसाई, महादेव ऊर्फ आप्पा परब यांचाही समावेश

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाकडून दिल्या जाणाऱ्या पत्रकार पुरस्कारांची घोषणा मंगळवारी पत्रकार संघाच्या बैठकीत करण्यात आली आहे. पुरस्कार प्राप्त पत्रकारांना ६ जानेवारी रोजी सावंतवाडी येथे होणाऱ्या पत्रकार दिन कार्यक्रमात पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यकारिणीची बैठक आज सिंधुदुर्गनगरी येथे पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी पत्रकार संघाचे सचिव उमेश तोरसकर, विभागीय सचिव नंदकिशोर महाजन आदींसह कार्यकारणी पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. या बैठकीत पत्रकार संघाचे पुरस्कार सर्वानुमते निश्चित करण्यात आले. गणेश जेठे यांनी या नावांची घोषणा केली. सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाकडून या वर्षी एकूण सहा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. त्यामध्ये आदर्श पत्रकार पुरस्कार कुडाळ पत्रकार अजय सावंत, कणकवलीचे नितीन कदम यांना जाहीर करण्यात आला. उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार सावंतवाडीचे विजय देसाई व वैभववाडीचे नरेंद्र कोलते यांना जाहीर करण्यात आला. उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार मालवणचे समीर म्हाडगूत यांना तर ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार वेंगुर्ल्याचे महादेव ऊर्फ आप्पा परब यांना जाहीर करण्यात आला. यावर्षीचा पत्रकार दिनाचा कार्यक्रम ६ जानेवारी रोजी सावंतवाडी तालुक्यात घेण्यात येणार असून सावंतवाडी तालुका पत्रकार समिती आणि सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात सर्व पुरस्कार प्राप्त पत्रकारांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!