… तर त्या कारवाईला उत्तर देण्यासाठी राणे परिवार आणि भाजपा समर्थ
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून नितेश राणेंची पाठराखण
कुणाल मांजरेकर
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या बाबतची आक्षेपार्ह टिप्पणी आणि शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील कथित हल्ला प्रकरणात आमदार नितेश राणे यांना घेरण्यासाठी राज्य सरकारने पूर्ण तयारी केल्याचे चित्र दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील नितेश राणे यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत. नितेश राणे यांचा आवाज दडपण्याचे प्रयत्न केले जात आहेत. परंतु त्यांना उत्तर देण्यासाठी राणे परिवार व भाजपा समर्थ आहे, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
या संदर्भात त्यांनी ट्विटरवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. आपल्याविरोधात उठणारा आवाज दाबण्यासाठी हे सरकार वारंवार असंवैधानिक मार्गांचा वापर करते. नितेश राणे यांचा आवाज दडपण्याचे प्रयत्न केले जात आहेत, परंतु त्यांना उत्तर देण्यासाठी राणे परिवार व भाजपा समर्थ आहे. ठाकरे सरकारने नितेशजींना अटक केली, तरीही न्यायालयात ही कारवाई टिकणार नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.