“म्याव – म्याव” वरून विधिमंडळात वातावरण तापलं ; नितेश राणेंबाबत उद्या होणार निर्णय !
विधानसभा अध्यक्षांचे स्पष्टीकरण ; सत्ताधारी- विरोधकांची होणार बैठक
कुणाल मांजरेकर
भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेना नेते तथा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीचा मुद्दा सोमवारी विधिमंडळ अधिवेशनात चांगलाच गाजला. याप्रकरणी आमदार नितेश राणे यांचे निलंबन करण्यासाठी शिवसेनेच्या आमदारांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर सभागृहात मोठा गोंधळ निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले. नितेश राणे यांचे वक्तव्य अयोग्य असल्याचे स्वतः विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगतानाच हा प्रकार सभागृहाबाहेर घडल्याने त्यांचे निलंबन करणे चुकीचे असल्याचे मत व्यक्त केले. दरम्यान, दोन्ही बाजूंकडून होणारा गोंधळ लक्षात घेतल्यानंतर नितेश राणेंबाबत निर्णय घेण्यासाठी उद्या मंगळवारी सत्ताधारी आणि विरोधकांची संयुक्त बैठक घेण्यात येणार असल्याचे विधानसभाध्यक्ष यांनी म्हटले आहे. त्यामुळे उद्याच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनावेळी विरोधकां कडून सभागृहाच्या पायर्यांवर आंदोलन सुरू असताना भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी त्याच वेळी येथून जाणाऱ्या पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना उद्देशून “म्याव म्याव” च्या घोषणा दिल्याने मागील दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील वातावरण तापलं आहे. या कृतीचा शिवसेनेकडून तीव्र शब्दात निषेध केला जात असून सोमवारी विधिमंडळाच्या अधिवेशनात शिवसेनेच्या आमदारांनी नितेश राणे यांच्या निलंबनाची जोरदार मागणी केली. शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी आदित्य ठाकरे आमच्यासाठी महनीय असून त्यांच्या विरोधातील वक्तव्याचा आम्ही निषेध करत असल्याचे सांगून यापुढे असले प्रकार शिवसेना खपवून घेणार नाही असा सज्जड इशारा दिला. तर शिवसेनेचे सभागृह नेते सुनील प्रभू यांनी काही दिवसांपूर्वी भास्कर जाधव यांच्याकडून पंतप्रधान मोदीं बाबत आक्षेपार्ह टिप्पणी झाल्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केल्याची आठवण करून दिली. त्याउलट नितेश राणेंकडून स्वतःच्या वक्तव्याचे समर्थन केले जात असल्याचे ते म्हणाले. यामुळे नितेश राणे यांचे निलंबन झाले पाहिजे अशी जोरदार मागणी त्यांनी केली. तर भास्कर जाधव यांनीही नितेश राणे यांनी सभागृहाची माफी मागावी अशी मागणी केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी नितेश राणेंकडून झालेले कृत्य असमर्थनीय असल्याचे सांगतानाच हे कृत्य सभागृहात झालेले नाही. त्यामुळे त्यांचे निलंबन करणे अयोग्य असल्याचे मत व्यक्त केले. दोन्ही बाजूंकडील चर्चेमुळे सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी नितेश राणे यांच्या वक्तव्यावर निर्णय घेण्यासाठी उद्या मंगळवारी आपल्या चेंबरमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांची एकत्रित बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे उद्याच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.