आदित्य ठाकरेंच्या खिल्लीचा शिवसेनेने घेतला “बदला” !

“बाबा मला वाचवा…कॉक कॉक कॉक कॉक” शिवसेनेच्या गगनभेदी घोषणा

कणकवली : विधिमंडळाच्या अधिवेशनावेळी पायर्‍यांवर बसून शिवसेना नेते पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची म्याव म्याव म्हणून खिल्ली उडवणाऱ्या भाजपा आमदार नितेश राणे यांना शिवसेनेने सोमवारी कणकवलीत प्रत्युत्तर दिले आहे. “म्याव म्याव” चा बदला म्हणून शिवसेनेने कणकवलीत “बाबा मला वाचवा…कॉक कॉक कॉक कॉक” अशा घोषणा दिल्या.

विधानभवनात पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे दाखल होत असताना भाजपा आमदार नितेश राणे यांनी म्याव म्याव असा आवाज काढत आदित्य ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आदित्य ठाकरे यांनी नितेश राणेंकडे दुर्लक्ष केले होते. आ. नितेश राणेंच्या या कृतीचे पडसाद सोमवारी विधानसभेतही उमटले. शिवसेनेचे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब वरील हल्ल्याच्या गुन्ह्यात आमदार नितेश राणेंना अटक करा या मागणीसाठी शिवसेनेने कणकवली पोलीस ठाण्यावर धडक दिली. पोलीस ठाण्यात जात असताना आणि पोलिसांना निवेदन देण्यापूर्वी शिवसैनिकांनी ‘बाबा मला वाचवा… कॉक कॉक कॉक कॉक’ अशा घोषणा देत नितेश राणेंनी केलेल्या ‘म्याव म्याव’चा बदला घेतला. केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी रविवारी 26 डिसेंबर रोजी पत्रकार परिषदेत संतोष परब हल्ल्यात पोलीस बळाचा गैरवापर करून राज्य सरकार नितेश राणेंना अटक करण्याचा संभव असल्याचे म्हणत तसे झाल्यास आपण गप्प बसणार नसल्याचा इशारा दिला होता. तर आ. नितेश राणे यांनीही ट्विटरवर व्हिडीओ शेअर करत या हल्ल्यात मला गोवून अटक करण्याचा डाव असल्याचे सांगितले होते. या पार्श्वभूमीवर केंद्रीयमंत्री नारायण राणेंनी नितेश राणेंच्या संभाव्य अटकेबद्दल केलेले वक्तव्य हे नितेश राणेंना प्रोटेक्ट करणारे आहे. त्यामुळेच ‘बाबा मला वाचवा… कॉक कॉक कॉक कॉक’ ही घोषणा देत शिवसैनिकांनी विधानभवनात नितेश राणेंनी काढलेल्या ‘म्याव म्याव’ आवाजाचा बदला घेतल्याचे आज दिसून आले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!