मालवण तालुक्यातील बलाढ्य लोकप्रतिनिधी शिवसेनेत प्रवेश करणार ?
राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
कुणाल मांजरेकर
मालवण : मालवण तालुक्यातील ग्रामीण राजकारणातील मोठे नाव असलेला भाजप मधील एक बलाढ्य लोकप्रतिनिधी येत्या काही दिवसांत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा राजकिय गोटात सुरू आहे. तालुक्यातील राजकारणाला कंटाळून हा लोकप्रतिनिधी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे.
या लोकप्रतिनिधीने शिवसेनेत प्रवेश केल्यास शिवसेनेला आगामी निवडणूकीत आक्रमक चेहरा मिळणार असून तालुक्यात शिवसेनेला अधिक बळ मिळणार असल्याचेही बोलले जात आहे. मात्र हा लोकप्रतिनिधी शिवसेना प्रवेश करणार ? की त्यांची नाराजी दूर करण्यात पक्षाला यश येणार हा आगामी काळच ठरवणार आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतसह विविध सहकारी सोसायट्या तसेच इतरही पंचक्रोशीतील राजकीय बलस्थाने एकहाती ताब्यात ठेवण्याची ताकद या लोकप्रतिनिधी मध्ये आहे. मात्र अलीकडे स्थानिक सहकाऱ्यांच्या कामकाजामुळे पक्षात त्याची घुसमट होत असून गेले अनेक महिने तो लोकप्रतिनिधी आपल्या पक्षाच्या कार्यक्रमापासून काही हात लांबच असल्याचे दिसून येत होते. शिवसेनेने आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली असून संघटना बांधणीसाठी या लोकप्रतिनिधीला आपल्याकडे ओढण्यासाठी शिवसेनेने फिल्डींग लावली आहे. लवकरच संबंधित लोकप्रतिनिधी शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे.
नारायण राणेंशी एकनिष्ठ
सदरील पदाधिकारी मागील ३२ वर्ष राजकारणात असून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून त्याची ओळख आहे. मात्र तालुक्यातील राजकारणाला कंटाळून तो शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे समजते. तालुक्यात सुरू असलेली चर्चा खरी आहे की विरोधकांनी निर्माण केलेली हवा ? याबाबत त्या लोकप्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. मात्र त्यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा मात्र जोरदार सुरू आहे.