राष्ट्रीय काँग्रेसचे मालवण तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी जिल्हा बँक निवडणूक रिंगणात !
विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग या गटासाठी महाविकास आघाडीमधून अर्ज सादर
कुणाल मांजरेकर
मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक मध्ये विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग या गटासाठी राष्ट्रीय काँग्रेसचे मालवण तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी यांनी कुडाळ प्रांताधिकारी सौ. वंदना खरमाळे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला.
सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक ही सर्वच राजकिय पक्षांना महत्वाची असली तरी या बँकेवर यापूर्वी देखील काँग्रेस प्रणित पॅनल अनेकदा निवडून आले आहे. यंदा ही बँक काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या पक्षांनी आघाडी करून एकत्रित लढविण्याचा निर्णय घेतला असून जिल्हा बँकेवर विमुक्त जाती, भटक्या जमाती विशेष मागस प्रवर्ग या गटातून निश्चितपणे आपला विजय होईल, असा विश्वास मेघनाद धुरी यांनी व्यक्त केला आहे.
मत्स्य व्यवसायाच्या माध्यमातून जिल्ह्यात मेघनाद धुरी यांनी उत्तमरीत्या फेडरेशन संघटना बांधली असून अनेक वर्षे बँकेचे मतदार म्हणून अनेक जणांना त्यांनी सहकार्य केले आहे. या सर्व त्यांच्या जमेच्या बाजू पाहता काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीमधून धुरी यांना या गटातून जिल्हा बँक संचालक मंडळावर जाण्यासाठी संधी दिली आहे. सामाजिक क्षेत्रातील कार्याच्या तसेच काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष म्हणून मेघनाद धुरी यांचा जनसंपर्क दांडगा असून सिंधुदुर्ग जिल्हा प्रभारी विनायक देशमुख, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळा गावडे, आमदार वैभव नाईक, राष्ट्रवादी व्हिक्टर डांट्स, माजी जिल्हाध्यक्ष विकास सावंत, साईनाथ चव्हाण, यांच्या मुख्य समन्वयाखाली ही उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना मेघनाद धुरी यांच्या समवेत जिल्हा युवक काँग्रेसचे प्रवक्ते अरविंद मोंडकर, मालवण तालुका मच्छीमार संस्थेचे विकी चोपडेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.