शिवसेनेच्या लोकप्रतिनिधीना रमेश गोवेकरचा विसर !
खा. विनायक राऊतांना अंकुश राणे आठवतात, पण रमेश गोवेकर नाही
मनसे नेते परशुराम उपरकर यांची टीका : खड्डेमय रस्ते, रखडलेल्या बसस्थानका वरून आ. वैभव नाईक यांचाही घेतला समाचार
कुणाल मांजरेकर
मालवण : सरकारच्या लोकप्रतिनिधींना कार्यकर्त्यांचा विसर पडला आहे. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांचे बंधू रमेश गोवेकर हे २००५ च्या माझ्या पोटनिवडणुकीत बेपत्ता झाले. माझ्या आमदारकीच्या सहा वर्षांच्या काळात मी अधिवेशनात सातत्याने याबाबत आवाज उठवला. दिल्लीमध्ये जाऊनही दाद मागितली. मात्र जिल्ह्यात निवडून आलेल्या आमदार आणि खासदारांनी एकदाही रमेश गोवेकर बेपत्ता प्रकरणाबाबत अधिवेशनात आवाज उठवला नाही. एवढेच काय, शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांना काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत अंकुश राणे आठवला, पण भाई गोवेकरांच्या भावाची आठवण होत नाही, ही कार्यकर्त्यांची शोकांतिका आहे, अशी प्रतिक्रिया मनसे सरचिटणीस, माजी आमदार परशुराम उपरकर यांनी मालवण येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली. यावेळी खड्डेमय रस्ते आणि मालवण बसस्थानकाच्या रखडलेल्या कामाबाबत आमदार वैभव नाईक यांच्यावरही उपरकर यांनी सडकून टीका केली.
शासकीय विश्रामगृहावर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी तालुकाप्रमुख विनोद सांडव यांच्यासह मनसेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून युवासेनेने काल केलेल्या आंदोलनावरही परशुराम उपरकर यांनी टीका केली. युवासेनेने पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात सायकल रॅली काढली. तर काँग्रेसवालेही जिल्ह्यात आंदोलनाची भूमिका घेत आहेत. आपण सत्तेत असल्याचे भान या दोन्ही पक्षांना राहिलेले नाही. गोवा सरकारने स्वतःच्या अधिकारात पेट्रोल- डिझेलचे भाव कमी केले. त्याप्रमाणे राज्य सरकारनेही आपला पेट्रोल वरील सेस कमी केल्यास जनतेला स्वस्त दरात पेट्रोल-डिझेल मिळू शकते. एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पेट्रोल डिझेलचे दर वाढल्यामुळे एसटी आणि बेस्टचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याचे म्हणतात. तर दुसऱ्या बाजूने यांचे युवा कार्यकर्ते दरवाढी निषेधार्थ सायकल रॅली काढतात. केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅस जीएसटी मध्ये आणण्याची घोषणा केली होती. मात्र महाराष्ट्र सरकारने याला विरोध केला. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या भांडणात येथील जनता होरपळत असून जनतेला महागाईचे चटके बसत असल्याचे उपरकर म्हणाले. जनतेने विकास कामे करण्याची संधी राज्यातील सत्ताधारी पक्षाला दिली असताना हे पक्ष सातत्याने आंदोलने करत आहेत. याचा अर्थ सरकार काम करण्यात अपयशी ठरत असल्याचे परशुराम उपरकर म्हणाले.
मालवण बसस्थानकाच्या रखडलेल्या कामाचीही जबाबदारी घ्या !
परशुराम उपरकर यांनी आमदार वैभव नाईक यांच्यावरही टीका केली. दसरा झाला, दिवाळी आली तरीही आ. वैभव नाईक यांनी जबाबदारी घेतलेले रस्त्यावरील खड्डे कायम आहेत. वैभव नाईक यांनी आपल्या निवडणुकीपूर्वी मालवण बसस्थानकाच्या नूतनीकरणाचा नारळ फोडला होता. येथील जनतेला अद्यावत बसस्थानकाचे स्वप्न दाखवले. मात्र हे बस स्थानक का रखडले ? ज्याप्रमाणे वैभव नाईक यांनी खड्ड्यांची जबाबदारी घेतली, त्याप्रमाणेच मालवण बसस्थानकाच्या रखडलेल्या कामाचीही जबाबदारी घ्यावी. आणि मी अकार्यक्षम आमदार आहे, हे जनतेला दाखवून द्यावे, असे परशुराम उपरकर म्हणाले