नारायण राणे सिर्फ झाकी है… शिवसेना निलेश राणे अभी बाकी है !

निलेश, तुझ्या पाठीशी हा एकनाथ शिंदे ; तुझ्या विजयाचे फटाके फोडायला मी पुन्हा येणार ; मुख्यमंत्र्यांची कुडाळच्या महामेळाव्यात ग्वाही

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत माजी खासदार निलेश राणेंचा शिवसेनेत प्रवेश ; २५ हजाराहून अधिक जनसमुदाय तब्बल पाच तास कार्यक्रमस्थळी खिळून

कुडाळ | कुणाल मांजरेकर

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून राहिलेला फायर ब्रँड नेते, माजी खासदार निलेश राणे यांचा शिवसेना प्रवेशाचा महासोहळा बुधवारी सायंकाळी उशिरा कुडाळ हायस्कुलच्या मैदानावर पार पडला. या निमित्त पार पडलेल्या महायुतीच्या महामेळाव्याला तब्बल २५ हजारांचा विराट जनसमुदाय लोटला होता. दुपारी ४ वाजता नियोजित असलेला हा मेळावा एक तास उशिराने सुरु होऊन रात्री ९ वाजेपर्यंत सुरु होता. तरीही निलेश राणे यांच्या प्रेमापोटी तब्बल पाच तास विराट जन समुदाय एकाच जाग्यावर खिळून होता. नारायण राणे यांनी ज्या पक्षातून आपल्या राजकीय वाटचालीची सुरुवात केली,  त्या ठिकाणी निलेश राणे आज आले आहे. निलेश राणे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे आज खऱ्या अर्थाने जिल्ह्यात महायुतीला बळ मिळाले आहे. लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांनी कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघात २६ हजारांचे लीड घेतले होते. निलेश राणे येथून किमान ५२ हजारांचे लीड घेतील, असे सांगून “नारायण राणे सिर्फ झाकी है, निलेश राणे अभी बाकी है..” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. येथील जनतेने मतदार संघाच्या विकासासाठी निलेश राणे यांच्या पाठीशी उभे रहावे, असे सांगतानाच निलेश, हा एकनाथ शिंदे तुझ्या पाठीशी उभा आहे, असा विश्वास त्यांनी दिला.

माजी खासदार निलेश राणे यांच्या शिवसेना प्रवेशानिमित्त कुडाळ हायस्कुलच्या मैदानावर आयोजित महायुतीच्या विराट मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या हस्ते निलेश राणे यांनी शिवधनुष्य उचलून भगवा हाती घेतला. यावेळी टाळ्यांच्या कडकडाटात उपस्थितांनी त्यांना भविष्यातील वाटचालीला शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, कोकणच्या विकासाला गती देण्यासाठी निलेश राणे आज शिवसेनेत आले आहेत. तब्बल पाच तास हा विराट जन समुदाय एकाच जाग्यावर थांबून आहे, ही येथील जनतेची राणेसाहेबांवरील प्रेमाची पोचपावती आहे. एवढे कार्यकर्ते निलेश राणे यांच्या प्रचारात उतरले तर समोरच्याचे डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आजचा प्रवेश हा ऐतिहासिक आहे, असे सांगून कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. लोकसभा निवडणुकीत याची प्रचिती आली. कार्यकर्ता कसा जपायचा हे राणेसाहेबांकडे बघून दिसते. त्यांच्या खासदारकीला विरोधकांनी अनेक फेक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला. मात्र येथील जनतेने त्यांना भक्कमपणे साथ दिली. कोकणात शिवसेना वाढवण्यामागे राणेसाहेबांचा मोठा वाटा आहे. पण त्यांना कोणत्या परिस्थितीत शिवसेना सोडावी लागली, हे तुम्हाला माहित आहे. ज्यांचा स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास नसतो त्याला मास्क लीडर घालवावे लागतात, असे सांगून उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांनी टोला लगावला. 

त्यांचा चेहरा मित्रपक्षाला चालत नाही, मग जनतेला कसा चालणार ?

शिवसेनेत फाटाफूट झाली नसती तर शिवसेनेला आव्हान देण्याची हिंमत कोणाची झाली नसती, असे सांगून आज ठाकरेंना एकेका तिकिटासाठी दिल्लीतल्या गल्ली गल्लीत फिरावं लागत आहे. मुख्यमंत्री पदासाठी त्यांचा चेहरा त्यांच्या मित्रपक्षाला चालत नसेल तर लोकांना कसा चालणार ? असा सवाल करून लोकसभेला विरोधकांना मिळालेले यश ही त्यांना सुज आहे. या विधानसभा निवडणुकीत जनता त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.

महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली. याचा अनेक महिलांना फायदा झाला असून ही योजना बंद करण्यासाठी महाविकास आघाडी कोर्टात गेली आहे. महिलांच्या या योजनेत ज्यांनी खोडा घातला आहे, त्या घोडा लावल्यााशिवाय लाडक्या बहिणी गप्प बसणार नाहीत, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3840

Leave a Reply

error: Content is protected !!