कोणी उमेदवार देता का … उमेदवार ; उबाठाला नितेश राणेंच्या विरोधात उमेदवार मिळेना !
पहिल्या यादीत उमेदवाराची निवड करण्यात अपयश ; बळीचा बकरा बनण्यास कोणीही तयार होईना ?
सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर
शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाच्या वतीने विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या ६५ उमेदवारांची यादी बुधवारी जाहीर करण्यात आली आहे. यात सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकणातील बहुतांश उमेदवारांचा समावेश आहे. मात्र कणकवली देवगड वैभववाडी मतदार संघात उमेदवाराच्या नावाची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. या मतदार संघात मागील दोन टर्म भाजपचे आक्रमक आणि अभ्यासू नेते नितेश राणे आमदार आहेत. यावेळी ते विजयाची सहज हॅट्ट्रिक करतील असा राजकीय निरीक्षकांचा अंदाज असून त्यामुळेच नितेश राणेंच्या विरोधात उबाठाला उमेदवारच मिळत नसल्याचे चित्र आहे. उमेदवारी घेऊन बळीचा बकरा बनण्यास कोणीही इच्च्छुक नसल्याने कणकवली मतदार संघात कोणता निर्णय घ्यायचा ? असा यक्ष प्रश्न उबाठा नेतृत्वाला पडला आहे.
कणकवली विधानसभा मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम मागील दहा वर्षांच्या काळात आमदार नितेश राणे यांनी केले. या मतदार संघाचा विकासात्मक कायापालट त्यांनी केला असून कोट्यावधींचा विकास निधी येथे आणला आहे. दुर्लक्षित राहिलेल्या देवगड आणि वैभववाडी तालुक्यांना विकासाच्या स्पर्धेत आणण्याचे काम त्यांनी केले असून यामुळेच आज हे दोन्ही तालुके आर्थिक दृष्ट्या सक्षम होत आहेत. यामुळे मतदार संघातील सर्वसामान्य जनतेचा मोठा प्रतिसाद नितेश राणे यांना मिळत असल्याचे म्हटल्यास चूकीचे ठरणार नाही.
मागील विधानसभा निवडणुकीत राणेंचे सहकारी राहिलेल्या सतीश सावंत यांनी नितेश राणेंच्या विरोधात तेव्हाच्या शिवसेनेकडून उमेदवारी दाखल केली. मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील नितेश राणेंच्या नेतृत्वाखाली भाजपने विरोधकांना चारीमुंड्या चित केले. त्यामुळे नितेश राणेंच्या समोर विरोधक मनाने हरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. म्हणूनच की काय नितेश राणेंच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी उबाठा मधून कोणीही पुढे येत नसल्याचे चित्र पाहायला मिळते. मागील वेळी राणेंच्या विरोधात उभे असलेल्या सतीश सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण यंदाच्या निवडणूक रिंगणातून माघार घेत असल्याचे जाहीर करून टाकले. बुधवारी उबाठाने आपल्या ६५ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. यात रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, गुहागर, रत्नागिरी, राजापूर तर सिंधुदुर्गातील कुडाळ आणि सावंतवाडीच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. मात्र कणकवलीच्या उमेदवारी बाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे कणकवली बाबत ठाकरेंच्या मनात नक्की चाललंय काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.