सिंधुदुर्ग हादरला : सावंतवाडीत दोघा वृद्ध महिलांचे खून
धारदार हत्याराने भोसकले ; घटनास्थळी अज्ञाताच्या पायाचे ठसे
सावंतवाडी : सावंतवाडी उभाबाजार परिसरात दोन वृध्द महिलांचा खून झाल्याची घटना निदर्शनास आल्याने जिल्हा हादरला आहे. नीलिमा नारायण खानविलकर (वय ८०) व शालिनी शांताराम सावंत (वय ७५) अशी या महिलांची नावे आहेत. एखाद्या धारदार शस्त्राने अज्ञाताने त्यांच्यावर हल्ला केला आहे. घटनास्थळी रक्ताने माखलेल्या एका पायाचा ठसा दिसून आला असून पोलिसांनी ठसे तज्ज्ञांना पाचारण केले आहे.
चोरीच्या उद्देशाने किंवा मालमत्तेच्या वादातून हा खून झाला असावा असा अंदाज पोलिस निरीक्षक शंकर कोरे व्यक्त केला असून याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तौसिफ सय्यद करीत आहेत. दरम्यान, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर यांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार निलिमा खानविलकर या त्यांच्या जवळच्या नातेवाईक आहेत.
तर मृत शालिनी सावंत या निलिमा खानविलकर यांच्याकडे केअरटेकर म्हणून काम करत होत्या. मसुरकर हे नेहमी त्यांची विचारपूस करण्यासाठी जायचे. आज सकाळी नेहमीप्रमाणे त्यांना घरी टीव्ही लावून देण्यासाठी गेले असता हाक मारल्यानंतर त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे ते थेट घरात गेले त्यावेळी त्या दोघी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. हा सर्व प्रकार पाहून त्यांनी याबाबतची माहिती सावंतवाडी पोलीस ठाण्याला फोन करून दिली. हा प्रकार अज्ञात चोरट्याकडून झाला असावा, त्यांच्या गळ्यात सोन्याच्या चैन होत्या. त्यामुळे सोन्यासाठी त्यांचा खून झाला असावा, असा संशय व्यक्त होत आहे. याबाबतची खबर त्यांच्या भाच्याला दिल्या नंतर तो या ठिकाणी यायला निघाला आहे. या बाबत तपासा अधिकारी तौसिफ सय्यद यांना विचारले असता दोघांवर धारदार शस्त्राने वार केले आहेत. दोघे रक्तबंबाळ अवस्थेत घटनास्थळी पडून आहेत. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांचे निधन झाले. मात्र नेमका खून का झाला याबाबत तपास करण्यात येणार आहे. तर अधिक तपासासाठी फोरेन्सिक एक्सपर्टना बोलविण्यात आले असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.