रस्ता सुशोभिकरणाच्या नावाखाली मालवणात नगरपालिकेचे वेगळेच धंदे ?
उपनगराध्यक्ष राजन वराडकर, गणेश कुशे यांचा सनसनाटी आरोप
जोशी कुटुंबियांची फसवणूक; आजच्या भूमिपूजन कार्यक्रमावर बहिष्कार
कुणाल मांजरेकर
मालवण : मालवण नगरपालिकेने शहरात काही नवीन विकास कामे मंजूर केली आहेत. मात्र पालिकेच्या आवारातील बालोद्यानचे सुशोभिकरण (गार्डन) करण्याच्या नावाखाली त्यातून रस्ता नेण्याचा घाट पालिकेतील सत्ताधाऱ्यांकडून घालण्यात आला आहे. ही बाब निषेधार्ह आहे. याठिकाणची झाडेही तोडण्यात आली आहेत. बालोद्यानसाठी ज्या हेतूने जोशी कुटुंबीयांनी जागा उपलब्ध करून दिली होती, तो हेतूच बाजुला राहिला आहे. याबाबत संबंधितांनी आक्षेप नोंदवला आहे. जोशी कुटुंबियांनी त्यावेळी बालोद्यान उभारणीसाठी बक्षिसपत्राने पालिकेला विनामोबदला जागा दिली. त्यांच्या सामाजिक भावनेला छेदण्याचे काम पालिका प्रशासन हुकूमशाही पद्धतीने करत असल्याचा आरोप उपनगराध्यक्ष राजन वराडकर आणि भाजपा गटनेते गणेश कुशे यांनी केला आहे. कोणाच्या फायद्यासाठी त्या जागेतून रस्ता नेण्याचा प्रयत्न सुरू आहे? असा प्रश्नही त्यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. चुकीच्या पद्धतीने होत असलेल्या या कामाला आमचा विरोध असून याच्या निषेधार्थ आम्ही उद्याच्या भूमिपूजन कार्यक्रमावर बहिष्कार टाकत असल्याचे वराडकर व कुशे यांनी स्पष्ट केले.
उपनगराध्यक्ष दालनात पत्रकार परिषद झाली. यावेळी वराडकर म्हणाले, पालिकेच्या इमारतीबरोबरच बालोद्यानचेही सुशोभिकरण व्हावे ही सर्वांचीच इच्छा होती. यासाठी पालिकेच्या सभागृहातही अनेकदा चर्चा झाली होती. मात्र कै. बाबी हडकर बालोद्यानातून रस्ता नेण्याचा विषय कधीही सभागृहात आला नव्हता आणि सभागृहात मान्यतेसाठीही ठेवण्यात आला नव्हता, असे असताना थेट त्यातून रस्ता नेण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने यात निश्चीतच काहीतरी संशयास्पद असल्याचे दिसत आहे. या बालोद्यानचा आराखडा बनविण्याचे काम कोणाकडे सोपविले होते, याची चौकशी झाल्यास यातून सर्व गोष्टी जनतेसमोर येतील असेही वराडकर व कुशे यांनी सांगितले.
अगोदर भूमिपूजन केलेल्या विकास कामांचे काय झाले ?
शहरात यापूर्वी मंत्री महोदयांना आणून केलेल्या एसटी बसस्थानक, स्पोर्टस् कॉम्लेक्स, सफाई कर्मचारी वसाहत, रॉक गार्डन प्रवेशद्वार या सर्वांची आज काय स्थिती आहे हे प्रथम खासदार आणि मंत्री महोदयांना दाखविण्याची गरज आहे. प्रकल्प रखडल्याने जनतेच्या विकासासाठी आलेला निधी अडकून पडला आहे. आता पुन्हा अशाचप्रकारे हुकुमशाही पद्धतीने बालोद्यानातून रस्ता नेण्याचा डाव टाकला आहे. याबाबत आक्षेप नोंदवणाऱ्या जोशी कुटुंबीयांच्या पाठिशी आम्ही ठामपणे उभे राहणार आहोत.
फक्त स्वतःच्या फायद्यासाठी हा रस्ता बनविण्याची जबदरस्ती होत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. जोशी कुटुंबीयांनी जागा कशासाठी दिली होती, हे पालिलेचे तत्कालीन कर्मचारी असलेल्या नगराध्यक्षांना माहिती असतानाही त्यांनी त्यातून रस्ता नेण्याचा विचार केल्याने तो कशासाठी आणि कुणासाठी याचे उत्तर त्यांनी द्यावे, असेही श्री. वराडकर म्हणाले. पालिकेच्या आवारातील बालोद्यानचा आराखडा कोणी बनवला ? त्या ठिकाणाहून रस्ता नेण्याचा प्रयत्न का करण्यात येत आहे? घाईगाडबडीत निर्णय घेण्याची वेळ का आली आहे? याबाबत माहिती आपल्याकडे असून लवकरच सगळी पोलखोल करणार असल्याचे वराडकर यांनी सांगितले.
पालिकेचे उत्पन्न वाढविणारा, बेरोजगारांना रोजगार देणारा एक तरी प्रकल्प करण्यात आला काय? मागे भूमीपूजन केलेली कामे सध्या कोणत्या परिस्थितीत आहेत? या सर्वांचा पोलखोल आम्ही लवकरच करू असे वराडकर यांनी सांगितले. नगराध्यक्ष आपल्या अनुभवाचा फायदा जनतेसाठी करत आहेत, की स्वत:साठी हेही जनतेला समजेल असे श्री. कुशे यांनी सांगितले.