मालवणात बसस्थानक इमारतीचे काम रखडले ; भाजपने विचारला जाब
कामाच्या दर्जाबाबतही प्रश्न उपस्थित ; तातडीने काम पूर्ण करण्याची मागणी
मालवण : मालवण बसस्थानकाच्या नव्या इमारतीचे काम दोन वर्षांपूर्वी सुरू होऊन अद्यापही रखडलेल्या स्थितीतच आहे, या विरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेत आगार व्यवस्थापक नरेंद्र बोधे यांना धारेवर धरले. यावेळी कामाच्या दर्जाबाबतही प्रश्न उपस्थित केला आहे. जीर्ण धोकादायक इमारतीखाली प्रवासी येजा करत आहेत. तरी रखडलेले काम त्वरित सुरू करून दर्जेदार पद्धतीने करावे, अन्यथा भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी दिला आहे.
यावेळी जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, जिल्हा प्रवक्ते बाबा मोंडकर, उद्योग आघाडी जिल्हाध्यक्ष विजू केनवडेकर, गटनेते गणेश कुशे, नगरसेवक दीपक पाटकर, चिंदर उपसरपंच दीपक सुर्वे, संतोष गावकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. भाजप पदाधिकाऱ्यांनी बसस्थानकाच्या रखडलेल्या इमारती ठिकाणी भेट देत पाहणी केली. यावेळी आगार व्यवस्थापक यांनी हे काम एसटीच्या बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येते. त्या विभागाच्या वरिष्ठांना याबाबत माहिती दिली जाईल, असे सांगितले.
प्रवासी धोकादायक इमारतीखाली
मालवण बस स्थानक इमारत जीर्ण झाली असून धोकादायक बनली आहे. दोन वेळा इमारतीच्या स्लॅबचा काही भाग कोसळला. यात एक वृद्ध प्रवासी जखमीही झाला होता. अश्या धोकादायक इमारतीखाली प्रवासी येजा करत आहेत. तरी नव्या इमारतीचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अन्यथा भाजपा तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा तालुकाध्यक्ष चिंदरकर यांनी दिला आहे.