राजकोट पुतळा दुर्घटना : शिल्पकार जयदीप आपटेचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला

ओरोस : राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या शिल्पकार जयदीप आपटे यांचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने मंगळवारी फेटाळला आहे. मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या शिल्पकार जयदीप आपटे यांनी आपल्याला जामीन मिळावा यासाठी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात विनंती अर्ज दाखल केला होता. यावर मंगळवारी सुनावणी होऊन हा अर्ज प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. बी. गायकवाड यांनी नामंजूर केला आहे. पुतळा उभारते वेळी ज्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक होते. त्या गोष्टींची काळजी घेतली गेली नाही. त्याचबरोबर या पुतळा उभारणीमध्ये वापरण्यात आलेले सर्व साहित्य हे निकृष्ट दर्जाचे होते. अशाप्रकारचा युक्तिवाद सरकारी वकील यांनी केला. हा युक्तीवाद ग्राह्य मानत न्यायालयाने जयदीप आपटे यांचा जामीन अर्ज नामंजूर केला आहे. या कामी सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी आणि सहाय्यक सरकारी अभियोक्ता रुपेश देसाई यांनी काम पाहिले.

आपटे यांनी हे टेंडर दोन कोटी चार लाखाला घेतलेले होते. त्यांना संपूर्ण पैसे सुद्धा मिळालेले आहेत. परंतु पुतळा उभारताना जे साहित्य वापरले ते निकृष्ट दर्जाचे होते. तसेच बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे हा पुतळा कोसळला असे चौकशीत निष्पन्न झालेले आहे. यात त्यांचा सहभाग असल्याचे न्यायालयाचे निदर्शनास आणून दिले गेले. त्यामुळे न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. दरम्यान, न्यायालयाने या अगोदर या प्रकरणी चेतन पाटील याचा जामीन फेटाळलेला होता. आज आपटे याचा अर्ज सुद्धा फेटाळण्यात आला आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!