मालवणात ५ ऑक्टोबरला “गांधी विरुद्ध सावरकर” नाट्यकृती ; पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती
जीवन आनंद संस्थेच्या मदतीसाठी आयोजन ; जनतेने प्रतिसाद देण्याचे आवाहन
मालवण : निराधार, वयोवृध्द, मनोरूग्ण, आजारी, जखमी बांधवांना आश्रम आणि शेल्टर होमद्वारे आधार देण्याचे आणि त्यांच्या सेवा सुश्रुषेचे कार्य करणाऱ्या जीवन आनंद संस्थेच्या आर्थिक मदतीसाठी आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी पुरुषोत्तम बेर्डे लिखित, बाबा वर्दम थिएटर्स कुडाळ निर्मित व केदार सामंत दिग्दर्शित बिघडलेल्या पर्यावरणाचा शोध घेणारे “गांधी विरूध्द सावरकर” या नाटकाचा प्रयोग मालवणमधील मामा वरेरकर नाट्यगृहात दि. ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आला आहे. समाजातील सर्व निराधार आणि वंचित असलेल्या रस्त्यावरील निराधारांच्या सेवा सुश्रुषेसाठी जीवन आनंद संस्था सेवाभावी वृत्तीने गेली ११ वर्षे कार्यरत असून जनतेने या कार्यास सहकार्य करावे, असे आवाहन या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदिप परब यांनी मालवण येथे पत्रकार परिषदेत केले.
मालवण धुरीवाडा येथील बॅ. नाथ पै सेवांगणमध्ये ही पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप परब, गांधी विरुद्ध सावरकर नाटकाचे दिग्दर्शक केदार सामंत, अभिनेते डॉ.संजिव आकेरकर, घुंगुरकाठी सिंधुदुर्गचे संस्थापक अध्यक्ष सतिश लळीत, जीवन आनंद संस्थेचे सचिव ऍड.किसन चौरे आदी उपस्थित होते. यावेळी संदिप परब म्हणाले, जीवन आनंद संस्थेतर्फे मुंबई, पालघर, सिंधुदुर्गसह गोवा राज्यातील निराधारांसाठीचे आश्रम आणि शेल्टर होमद्वारे कार्य सुरू आहे. संस्थेच्या पणदूर ता.कुडाळ येथील संविता आश्रम व संलग्न असलेल्या किनलोस येथील सक्षम आश्रमात आणि अणाव येथील कै .सुप्रियाताई वेंगुर्लेकर पुनर्वसन केंद्र या आश्रम व केंद्रांत सध्या १९० बांधव असून आश्रमद्वारे बांधवांना अन्न, वस्र, निवारा ,आरोग्य व मनोरंजन या सुविधा देण्यात येत आहेत. संस्थेने आजवर देशभरातील विविध राज्यांतील ४२५ निराधार मनोरुग्ण बांधवांचे पत्ते शोधून त्यांचे कुटुंब पुनर्मीलन केले आहे, असेही संदीप परब म्हणाले.
जीवन आनंद संस्थेच्या आश्रमांद्वारे निराधार व वंचितांच्या सेवेचे कार्य करीत असतानाच पर्यावरण पूरक व संवर्धनासाठी वृक्ष लागवड, शेती, पशुपालन, भाजीपाला उत्पादन असे उपक्रम राबविले जात आहेत. माणसांच्या आताच्या आणि पुढील पिढ्यांच्या आणि सजीवसृष्टीच्या भल्यासाठी पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन झाले पाहिजे, अशी संस्थेची भूमिका आहे. विकासाच्या प्रक्रियेत वृक्ष तोड, जागतिक तपमान वाढ, निसर्गाचा बिघडलेला समतोल, प्लॅस्टिकचा कचरा अशी मोठी आव्हाने मानवजातीसमोर उभी आहेत. अशा आव्हानात्मक परिस्थितीत पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने लोकशिक्षण आणि त्याजोडीला पर्यावरण पूरक कृतिकार्यक्रम होणे आवश्यक आहे. कोकणचा हिरवा निसर्ग वाचला पाहिजे. त्याचा अधिकाधिक विध्वंस होऊ नये. यादृष्टीने जनमानसात पर्यावरण विषयक जागृती व्हायला पाहिजे. या भूमिकेतून संस्थेच्या कार्यासाठी निधी उभारणी करीत असताना नाटकाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या , लोकशिक्षण करणाऱ्या ” गांधी विरुद्ध सावरकर या नाटकाच्या चॅरिटी शो चे आयोजन करण्यात आले आहे, असल्याची भूमिका संदिप परब यांनी यावेळी मांडली.
यावेळी केदार सामंत, डॉ. आकेरकर व सतीश लळीत यांनीही भूमिका मांडत जीवन आनंद संस्थेच्या कार्यासाठी व पर्यावरण संवर्धानाच्या दृष्टीने नागरिकांनी या नाटकाद्वारे सहकार्य करावे, असे आवाहन केले. अधिक माहितीसाठी संदीप परब 9820232765 व किसन चौरे 9270785182 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.