सिंधुदुर्ग महाविद्यालयाने आपली उज्ज्वल परंपरा निरंतर सुरूच ठेवावी !

सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या वतीने आयोजित हिरक महोत्सव व पर्यटन सप्ताहाच्या शुभारंभ प्रसंगी मुख्याधिकारी संतोष जिरगे यांचे प्रतिपादन

पर्यटन सप्ताहानिमित्ताने सॉफ्टलॅब कंपनीच्यावतीने “येवा डॉट इन” पोर्टलचा शुभारंभ ; पर्यटन विकासाला मिळणार गती

सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या वतीने विविध क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकारांचा विशेष सत्कार सोहळा संपन्न

मालवण | कुणाल मांजरेकर

स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाने अनेक विद्यार्थ्यांना पैलू पाडत त्यांना हिरा बनविण्यात मोठे योगदान दिले आहे. या महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रात कार्यरत असून महाविद्यालयासह मालवणचे नाव उंचावत आहेत. साठीमध्ये प्रवेश केलेले सिंधुदुर्ग महाविद्यालय आज पर्यटन सप्ताहासह विविध उपक्रम तेवढ्याच उत्साहाने राबवत आहे. सिंधुदुर्ग महाविद्यालयाने आपली उज्ज्वल परंपरा निरंतर सुरूच ठेवावी, असे प्रतिपादन मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे यांनी येथे बोलताना केले. 

मालवण येथील कृष्णराव सीताराम देसाई शिक्षण मंडळाने १९६५ साली स्थापन केलेल्या स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाला जून २०२५ मध्ये ६० वर्षे पूर्ण होत असून शैक्षणिक वर्ष २०२४-२५ या हिरक महोत्सवी वर्षाचा आणि महाविद्यालयातर्फे आयोजित पर्यटन दिन सप्ताहाचा शुभारंभ मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर, सचिव गणेश कुशे, संचालक विजय केनवडेकर, सॉफ्टलॅब कंपनीचे संचालक मिथिलेश बांदिवडेकर, डॉ. शशिकांत झाट्ये, साईनाथ चव्हाण, नितीन तायशेटे, संदेश कोयंडे, माजी विद्यार्थी संघटना अध्यक्ष सुधीर धुरी, प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर, ज्ञानेश्वर बांदकर, सौ. मेधा शेवडे, भालचंद्र केळूसकर, सौ. ऋणाली चव्हाण, गुरुनाथ राणे, भाऊ सामंत, नितीन वाळके, डॉ. राहुल पंतवालावलकर, प्रा. डॉ. सुमेधा नाईक आदी व इतर उपस्थित होते.यावेळी प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर यांनी प्रास्ताविक करत महाविद्यालयाच्या वाटचालीचा आढावा घेतला.

महाविद्यालयातर्फे आयोजित यंदाचा पर्यटन सप्ताह हा जिल्ह्यातील लोककला या संकल्पनेवर आधारित असल्याने यावेळी भजनसम्राट भालचंद्र केळूसकर, कीर्तनकार सौ. मेधा शेवडे, फुगडी कलाकार सौ. ऋणाली चव्हाण आणि फागगीते कलाकार ज्ञानेश्वर बांदकर यांचा विशेष सन्मान मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला.

विजय केनवडेकर यांनी मार्गदर्शन करताना जिल्ह्यात पर्यटन क्षेत्रातील संधी लक्षात घेऊन कॉमर्सच्या काही शाखा महाविद्यालयाला आम्ही जोडत आहोत, येथील विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन पर्यटन व्यवसायातून उत्पन्न मिळवावे, या दृष्टीने विविध उपक्रम कॉलेज राबवत आहे, असे सांगितले. साईनाथ चव्हाण, बाळासाहेब पंतवालावलकर यांनीही विचार मांडले.

महाविद्यालयातर्फे आयोजित पर्यटन सप्ताहानिमित्त दि. ३ ऑक्टोबर पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्यात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रमोद खरात यांनी केले. आभार डॉ. सुमेधा नाईक यांनी मानले. यावेळी मालवण शहरातील मान्यवर व्यक्ती, कॉलेजचे प्राध्यापक, कर्मचारी, आजी माजी विद्यार्थी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!