वैभव नाईकांचे १० कोटीचे आरोप हास्यास्पद ; असा आमदार लाभणे कुडाळ – मालवणच्या जनतेचे दुर्दैव
भाजपा नेते निलेश राणे यांची प्रतिक्रिया ; सलग १० ते १५ वर्षे जिल्हा प्रशासनात राहिलेला वरिष्ठ अधिकारी दाखवा
मालवण | कुणाल मांजरेकर
ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी जिल्हा परिषदेतील एका अधिकाऱ्याकडून यापूर्वीच्या पालकमंत्र्यांना दरमहा 10 कोटी रुपये दिले जात असल्याचा आरोप करून खळबळ उडवून दिली होती. मात्र या आरोपांची भाजपा नेते निलेश राणे यांनी चिरफाड केली आहे. वैभव नाईक यांच्या म्हणण्यानुसार राणेसाहेबांपासून ते केसरकर साहेब, उदय सामंत यांचा पालकमंत्री पदाचा कार्यकाळ दहा ते पंधरा वर्षांचा आहे. पण प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या तीन ते फार तर चार वर्षांनी होतात. मग एवढी वर्ष जिल्हा परिषद प्रशासनात असलेला वरिष्ठ अधिकारी कोण ते दाखवा, असे सांगून केवळ सवंग प्रसिद्धीसाठी वैभव नाईक असले आरोप करत असून त्यांना स्वतःला जर आरोप करता येत नसतील तर त्यांनी कोणातरी जाणकाराकडून आरोप लिहून घ्यावेत, असा सल्ला निलेश राणे यांनी दिला आहे.
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नावावर वैभव नाईक यांनी हे आरोप करून जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडवली होती. मात्र हे आरोप कसे चुकीचे आहेत, हे निलेश राणे यांनी दाखवून दिले आहे. याबाबत त्यांनी म्हटले आहे की, वैभव नाईक ही अपरिपक्व व्यक्ती आहे. कोणत्याही अधिकाऱ्याचा कार्यकाळ हा तीन वर्षाचा असतो. त्याला फार तर एक वर्षाची मुदत वाढ मिळू शकते. वैभव नाईक यांच्या आरोपाप्रमाणे राणेसाहेब, केसरकर साहेब, उदय सामंत यांचा पालकमंत्री पदाचा कार्यकाळ 10 ते 15 वर्षांचा आहे. 10 ते 15 वर्षांपासून प्रमुख पदावर आहे असा अधिकारी जिल्ह्यात आहे का ? असा सवाल करून एवढा कार्यकाळ बघितला असा एकही अधिकारी जिल्ह्यात नाही. वैभव नाईक यांना आरोप करता देखील येत नाही. दुर्दैवाने कुडाळ मालवणला असा आमदार भेटला आहे. त्यांच्या आरोपांना हात पाय नसतात. त्यांनी ज्यांना आरोप कळतात अशा कोणाकडून तरी आरोप लिहून घ्यावेत, असा सल्ला निलेश राणे यांनी दिला आहे.