….अन् अज्ञात वाहन अंगावरून गेल्याने “त्या” मद्यधुंद इसमाचा जागीच मृत्यू
मालवण तालुक्यातील राठीवडे मधलीवाडी रस्त्यावर गुरुवारी रात्रीची दुर्घटना ; अपघात की आत्मघात याची चर्चा
मालवण | कुणाल मांजरेकर
दारूच्या नशेत रस्त्यावर आडवे पडून राहिलेल्या चंद्रशेखर आप्पा धुरी (वय ४५, रा. राठीवडे, ता. मालवण) याच्या अंगावरून अज्ञात वाहन गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना गुरुवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास राठीवडे भावई मंदिरा समोरील रस्त्यावर घडली आहे. अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, राठीवडे येथील चंद्रशेखर धुरी याला दारूचे व्यसन होते. दारू पिऊन तो रस्त्यावर येऊन झोपायचा. गुरुवारी देखील तो दारूच्या नशेत असाच रस्त्यावर आडवा झाला. हे पाहून काही नागरिकांनी त्याला दोन ते तीन वेळा उठवून बाजूला नेले. मात्र तरीदेखील तो पुन्हा रस्त्यावर येऊन आडवा होत होता. मात्र रात्री ८ वाजण्याच्या सुमारास या मार्गावरून जाणाऱ्या अज्ञात वाहनाने त्याच्या अंगावरून वाहन घातल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.
अपघात की आत्मघात ?
चंद्रशेखर धुरी हा इसम मद्यधुंद अवस्थेत ज्या रस्त्यावर झोपून होता, त्या ठिकाणी पूर्णतः अंधार आहे. तो रस्त्यावर येऊन झोपल्याचे निदर्शनास येताच काही नागरिकांनी त्याला तेथून हटवले. पोलिसांनी देखील तेथे येऊन त्याला बाजूला केले होते. मात्र पुन्हा पुन्हा तो त्याठिकाणी येऊन रस्त्याच्या मधोमध येऊन आडवा झोपत होता. त्याने यापूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केला होता, अशी माहिती देखील घटनास्थळावरून मिळाली. त्यामुळे त्याचा मृत्यू हा अपघात की आत्मघात ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. अज्ञात वाहनाने त्याला चिरडल्यानंतर एक रिक्षा देखील त्यांच्या अंगावरून गेल्याचे समजते.