पश्चिम बंगाल मधील स्त्री डॉक्टरवरील अत्याचारा विरोधात मालवणात डॉक्टरांचा मूकमोर्चा
विविध समाजसेवी संघटनांचा पाठींबा ; एक दिवसाचा लाक्षणिक बंद पाळून डॉक्टरांकडून घटनेचा निषेध
मालवण (कुणाल मांजरेकर) : पश्चिम बंगाल मधील स्त्री डॉक्टरवर झालेल्या सामूहिक अत्याचार, बलात्कार आणि अमानुष खून प्रकरणाचे आज मालवणात पडसाद उमटले. या कृत्याचा निषेध करण्यासाठी आज देशव्यापी बंद पुकारण्यात आला आहे. या बंदला मालवण मेडिकल असोसिएशनने पाठिंबा देत एकदिवसाचा लाक्षणिक बंद पाळला. तर डॉक्टरांच्या वतीने मालवण शहरातून डॉक्टरांचा मुक मोर्चा काढून निषेध करण्यात आला. या मोर्चात डॉक्टरांसह विविध संघटना सहभागी झाल्या होत्या.
पश्चिम बंगाल मध्ये मेडिकल कॉलेज मधील स्त्री डॉक्टर वर सामूहिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आहे. या विरोधात देशभरात डॉक्टर आक्रमक झाले आहेत. शनिवारी डॉक्टरांनी एक दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारला आला आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर मालवणात आज १७ ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजल्यापासून पुढील २४ तासांसाठी अत्यावश्यक सेवा वगळता बाह्यरुग्ण सेवा बंद ठेवण्यात आली आहे. आज सकाळी डॉ. लीना लिमये, डॉ. मालविका झाटये, डॉ. शुभांगी जोशी यांच्या संकल्पनेतून मालवण मेडिकल असोसिएशनने डॉ. लिमये हॉस्पिटल येथून बाजारपेठेत मुक मोर्चा काढला. हा मोर्चा कमालीचा यशस्वी झाला. खांद्यावर काळी पट्टी, हातात फलक घेऊन हा मोर्चा काढण्यात आला. लिमयें हॉस्पिटल कडे हा मोर्चा समाप्त झाला.
या मोर्चात डॉक्टर, नर्सेस यांच्यासह लायन्स क्लब, रोटरी क्लब, केमिस्ट ड्रगिस्ट संघटना, नाथ पै सेवांगण, सिंधुदुर्ग महाविद्यालय, डी एड कॉलेज, बार असोसिएशन, मातृत्व आधार फाउंडेशन, शिल्पा खोत मित्रमंडळ, नंदिनी कलेक्शन ग्रुप आदी संघटना सह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान, पश्चिम बंगाल मधील घटनेच्या पार्श्वभूमीवर मालवणात महिलांसाठी आत्मसुरक्षा प्रशिक्षण वर्ग सुरु करण्याचा मनोदय यावेळी व्यक्त करण्यात आला.