विद्यार्थ्यांनी नियमित वाचना बरोबरच इतर साहित्याचेही वाचन करावे
एमआयटीएम अभियांत्रिकी कॉलेजचे प्राचार्य डॉ. डॉ. एस. व्ही. ढणाल यांचे प्रतिपादन ; कॉलेजमध्ये नॅशनल लायब्ररीयन डे साजरा
मालवण | कुणाल मांजरेकर
विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यासा बरोबरच विविध वाचन साहित्य वाचल्यास त्यांच्या भावी आयुष्यासाठी हे नक्कीच लाभदायक ठरणार आहे. “वाचाल तर वाचाल” त्याप्रमाणे “वाचाल तर ज्ञानी व्हाल”, असे सांगून इतर वाचन साहित्या बरोबर आपल्या ग्रंथालयात जर्नलसारखे वाचन साहित्य उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांनी त्याचाही उपयोग करावा. यामधून मिळणारे ज्ञान हे विद्यार्थ्यांना आयुष्यात यशस्वी होण्यासाठी नक्कीच मार्गदर्शक ठरेल, असा आशावाद एम आय टी एम इंजिनिअरिंग कॉलेजचे डिग्री विभागाचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. ढणाल यांनी येथे बोलताना व्यक्त केला.
जयवंती बाबू फाउंडेशन संचलित एम. आय. टी.एम. अभियांत्रिकी कॉलेजमध्ये नॅशनल लायब्ररीयन डे साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून एमआयटीएम कॉलेजच्या लायब्ररीत असणाऱ्या अभ्यासव्यतिरिक्त अन्य वाचन साहित्याचे प्रदर्शन भरवण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन कॉलेजच्या विश्वस्त सौ. वृषाली कदम यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनास विद्यार्थी तसेच प्राध्यापकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना विविध विषयातील पुस्तकांचे ज्ञान मिळावे तसेच ग्रंथालयातील इतर वाचन साहित्य यांची माहिती मिळावी यासाठी एमआयटीएम कॉलेजच्या ग्रंथपाल सौ. अपर्णा मांजरेकर यांनी डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून हे ग्रंथ प्रदर्शन भरविले तसेच त्यांच्या जीवन कार्याचा परिचय करून दिला. आणि त्यांच्या पंचसूत्री प्रमाणे प्रत्येक वाचकास त्याचा ग्रंथ मिळाला पाहिजे तसेच प्रत्येक ग्रंथाला त्यांचा वाचक मिळाला पाहिजे असे मार्गदर्शन केले. वेगवेगळ्या विषयांवरील वाचन साहित्य आपल्या ग्रंथालयात आहे हे प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले, असे त्या म्हणाल्या.
या कार्यक्रमाच्या वेळी विलास पालव यांनी विदयार्थ्यांना वाचन साहित्य का वाचले पाहिजे, याबद्दल सांगितले. आताची पिढी ही मोबाईलच्या आहारी गेली आहे. यासाठी या पिढीने चांगले उत्तम दर्जाचे वाचन साहित्य वाचावे. थोर महात्म्यांचे साहित्य वाचावे. वाचनाने मनुष्याला उत्तम कौशल्य प्राप्त होते. सतत वाचणारा माणूस हा तेजस्वी जाणवतो. त्याच्या बोलण्यात शब्दांची धार उत्तम असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी इंजीनियरिंग बरोबर अन्य वाचन साहित्य वाचण्याचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास कॉलेजच्या विश्वस्त सौ. वृषाली कदम, डिग्री कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. ढणाल, डिप्लोमा प्राचार्य विशाल कुशे, उपप्राचार्य पुनम कदम उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल सौ. अपर्णा मांजरेकर यांनी केले तर सायली गावडे यांनी आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ग्रंथालय कर्मचारी सायली पाटकर यांनी सहकार्य केले.