महिलांना आर्थिक समृद्धी देणारी बँक म्हणून सिंधुदुर्ग बँकेची देशात ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न : आ. नितेश राणे

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या महत्वाकांक्षी “बँक सखी” उपक्रमाचा शुभारंभ ; आ. नितेश राणे यांनी मनीष दळवी आणि टीमचे कौतुक

महिलांना आर्थिक साक्षर करण्याच्या दृष्टीने सिंधुदुर्ग बँक राबवत असलेले उपक्रम कौतुकास्पद : कांचनताई परुळेकर

आत्मविश्वासाने परिपूर्ण असलेले चेहरे आज “बँक सखी” च्या निमित्ताने पाहायला मिळाले : वर्षा पवार – तावडे

दुर्बल घटकातील महिलांना खासगी फायनान्स कंपन्यांच्या दुष्टचक्रातून १०० टक्के बाहेर काढणार : मनीष दळवी यांचा निर्धार

सिंधुदुर्गनगरी | कुणाल मांजरेकर

शेतकऱ्यांची बँक म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची ओळख आहेच, पण महिलांना आर्थिक समृद्धी देणारी बँक म्हणून जिल्हा बँकेचे देशात नाव असले पाहिजे यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. यासाठीच ‘बँक सखी” हा महत्वाकांक्षी उपक्रम आजपासून आम्ही सुरु करत आहोत. महिलांची आर्थिक उलाढाल वाढावी हा आमचा उद्देश असून जिल्ह्यातील महिलांनी आमच्या प्रयत्नांना साथ आणि आशीर्वाद द्यावेत, असे प्रतिपादन आमदार तथा सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे तज्ज्ञ संचालक नितेश राणे यांनी जिल्हा बँकेच्या बँक सखी या महत्वाकांक्षी उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना केले. जिल्हा बँकेच्या बैठकीत चर्चा होणारे ९० % उपक्रम मनीष दळवी आणि त्यांची टीम मार्गी लावतेच असे सांगून बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळाचे त्यांनी कौतुक केले. 

दरम्यान, महिलांना आर्थिक साक्षर करण्याच्या दृष्टीने सिंधुदुर्ग बँक राबवत असलेले उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रमुख पाहुण्या तथा कोल्हापूरच्या स्वयंसिध्दा संस्थेच्या अध्यक्षा कांचनताई समाजाला यांनी सांगितले. बँक सखीच्या निमित्ताने आत्मविश्वासाने परिपूर्ण असलेले चेहरे आज याठिकाणी पाहायला मिळाले, अशा शब्दात भारतीय स्त्री शक्तीच्या राष्ट्रीय संयुक्त सचिव वर्षाताई पवार – तावडे यांनी सांगून या उपक्रमाचे कौतुक केले. तर आज जिल्ह्यात खासगी फायनान्स कंपन्या दुर्बल घटकातील महिलांना वर्षाला दोन टक्के व्याजदराने कर्ज पुरवठा करून त्यांची पिळवणूक करीत आहेत. आज जिल्ह्यात अशा खासगी फायनान्स कंपन्यानी २०० कोटीहून अधिक व्यवसाय केला असून दुर्बल घटकातील महिलांना खासगी फायनान्स कंपन्यांच्या दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी १०० टक्के प्रयत्न करणार असल्याचा निर्धार बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी व्यक्त करून पुढील वर्षी या खासगी फायनान्स कंपन्यांना दोन कोटींचा देखील व्यवसाय मिळणार नाही, यासाठीच बँक सखी महिलांच्या दारापर्यंत जाऊन बँकेची सेवा देणार आहे, असे ते म्हणाले.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या महत्वाकांक्षी बँक सखी उपक्रमाचा शुभारंभ आज अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून ओरोस येथील शरद कृषी भवनमध्ये आमदार नितेश राणे यांच्यासह भारतीय स्त्री शक्तीच्या राष्ट्रीय संयुक्त सचिव वर्षा पवार – तावडे, कोल्हापूरच्या स्वयंसिध्दा संस्थेच्या अध्यक्षा कांचनताई परुळेकर यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, वर्षाताई पवार, कांचनताई परुळेकर, नाबार्डच्या जिल्हा प्रबंधक दीपाली माळी, डॉ. प्रसाद देवधर, निता राणे, गजानन गावडे, विठ्ठल देसाई, प्रज्ञा धावण, विद्याधर परब, प्रकाश बोडस, समीर सावंत, श्वेता कोरगांवकर, प्रज्ञा परब, सरोज परब, मेघा गांगण, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे यांच्यासह अन्य मान्यवर, बँकेचे अधिकारी, कर्मचारी आणि ग्राहक उपस्थित होते. याप्रसंगी मानसी देवधर यांनी जिल्हा बँकेच्या महिलांसाठी केलेल्या उपक्रमांवर साकारलेला लघुपट प्रसारित करण्यात आला. यावेळी प्रास्ताविक करताना बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर म्हणाले, महिलांना प्रतिष्ठा देण्याचे काम बँक सखीच्या माध्यमातून केले जाणार आहे. महिलांची दुःख महिलांनांच समजू शकतात. म्हणून या बँक सखीची संकल्पना राबवण्यात आली असून पुढील काळात महिला आणि महिला बचत गटातील दुवा बनण्याचे काम या बँक सखी करणार आहेत, असे ते म्हणाले.

कोकण बदलायचे असेल तर “बँक सखी” यशस्वी केली पाहिजे : कांचनताई परुळेकर

यावेळी कांचनताई परुळेकर यांनी अतिशय सविस्तर शब्दात महिलांना मार्गदर्शन करताना समाजाला अर्थसाक्षर करण्याची प्रतिज्ञा प्रत्येक बँक सखीने आज घेतली पाहिजे, असे सांगून महिला अर्थसाक्षर होण्यासाठी जिल्हा बँक राबवत असलेल्या उपक्रमांचे कौतुक केले. बँकेने तुम्हाला व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे, त्याचा फायदा तुम्ही कसा घ्याल, हे पाहणे गरजेचे आहे. तुमची सामाजिक, राजकीय आणि आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे. जिल्हा बँक तुम्हाला साधन देईल, सहाय्य देईल, पण तुमचा विकास तुम्हालाच करायचा आहे. त्यासाठी महिलांनी कौशल्य वाढवले पाहिजे. महिलांच्या यश कथा आणि अपयशाच्या कथा देखील वाचल्या पाहिजेत. त्यातून बरंच काही शिकता येईल, असे सांगून जिल्हा बँकेला देखील त्यांनी अनेक महत्वाच्या सूचना केल्या. बँकेच्या सहकार्याने महिलांनी प्रकल्प राबवावेत. त्यासाठी नकारात्मकता दूर करा. बँक सखी कार्यक्रम पूर्ण यशस्वी करा. केवळ या योजनेच्या उदघाट्नावर थांबू नका. बँकेने तुम्हाला योजना आणली आहे. त्यासाठी पैसा दिला आहे. कोकण बदलायचा असेल तर ही योजना यशस्वी केली पाहिजे. उद्या बदललेलं कोकण बघायला आम्हाला देखील येथे यायला आवडेल, असे त्या म्हणाल्या.

महिला सक्षमीकरणासाठी बँक सखीच्या माध्यमातून फारमोठी संधी : वर्षा पवार – तावडे

भारतीय स्त्रीशक्तीच्या राष्ट्रीय संयुक्त सचिव वर्षा पवार – तावडे म्हणाल्या, महिलांना नेहमीच बचत करण्याची सवय असते. परंतु ही बचत योग्यरित्या गुंतवणूक करण्याची माहिती नसते. ही गुंतवणूक दागिन्यात नाही तर ती व्यवसायात करायची असते. हे नवीन शिक्षण आपल्याला आता आपल्याला घ्यायचे आहे. आज नियुक्त झालेल्या बँक सखींचे आत्मविश्वासाने परिपुर्ण चेहेरे या योजनेची यशस्वीता अधोरेखित करते. उद्योग करणारी महिलेची भविष्यातील पुढची पिढी जागृत होऊन व्यवसायाच्या मार्गाने प्रगती करत असते. आत्ताची स्त्री चुल आणि मुल सांभाळणारी अशा प्रतिमेमधुन बाहेर पडते याचे मला कौतुक वाटते. त्यातुन स्त्रीकडे बघण्याचा दृष्टीकोन आता बदललाच पाहीजे. आणि हा दृष्टीकोन बदलण्यासाठी आजची स्त्री आर्थिकदृष्या सक्षम झाली पाहिजे. या सक्षमीकरणासाठी जिल्हा बँकेच्या बँक सखीच्या माध्यमातून फार मोठी संधी मिळते आहे ही फार मोठी गोष्ट आहे, असे त्यांनी सांगितले.

नाबार्डच्या जिल्हा प्रबंधक दीपाली माळी यांनी अत्यंत कमी वेळात जिल्हा बँकेने बँक सखी हा उपक्रम सुरु केल्याचे सांगून बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी आणि सहकाऱ्यांचे अभिनंदन केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बचत गट अतिशय चांगले काम करीत असल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी यावेळी डॉ. प्रसाद देवधर यांनीही विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती तोरसकर यांनी केले. या कार्यक्रमात बँक सखी महिलांना प्रतिनिधिक स्वरूपात नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. तसेच मानसी देवधर, उमेदचे वालावलकर, सुप्रिया वालावलकर यांचा सत्कार करण्यात आला. शेवटी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3844

Leave a Reply

error: Content is protected !!