भजन श्रवणातून पुण्याची प्राप्ती : भालचंद्र केळूसकर
श्री देव भूतनाथ देवस्थान यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय संगीत भजन स्पर्धेचे उदघाटन
युवा उद्योजक केदार झाड यांच्याहस्ते स्मृती चिन्हांचे अनावरण
मालवण : साधू संतांनी ईश स्तुती आणि समाज प्रबोधन यातून निर्माण केलेली भजन परंपरा त्याला कुठेही डाग न लावता चालू ठेवली आहे. आपल्या भजन परंपरेतील भारुड हा भाग भजना पासून दूर होत चालला होता. या भजन स्पर्धेच्या निमित्ताने भारुडासहित भजन श्रवणाचा लाभ भजन रसिकांना मिळणार आहे. भजन श्रवणातून पुण्याची प्राप्ती होत असते. परमेश्वराचे भजन प्रेमाने आणि श्रध्देने केले पाहिजे, असे प्रतिपादन संगीत विशारद बुवा भालचंद्र केळुस्कर यांनी केले.
श्री भूतनाथ देवस्थान, वायरी भूतनाथ यांच्या वतीने श्रावणी सोमवारच्या निमित्ताने भूतनाथ मंदिर येथे जिल्हास्तरीय संगीत भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि दीप प्रज्वलनाने करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर सरपंच भगवान लुडबे, संगीत विशारद भालचंद्र केळुस्कर, युवा उद्योजक केदार झाड, उपसरपंच प्राची माणगावकर, देवानंद लोकेगावकर, मोहन बोडवे, बाबी चव्हाण, दादा झाड, भालचंद्र देऊलकर, पूजा झाड, संदीप बोडवे, विनोद सातार्डेकर यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेसाठी १०००१, ७००१, ५००१, ३००१, प्रथम उत्तेजनार्थ ३००१, द्वितीय उत्तेजनार्थ २५०० चतुर्थ उत्तेजनार्थ २००० अशी आकर्षक स्मृती चिन्हासह रोख स्वरूपाची पारितोषिके असणार आहेत. ही पारितोषिके अनुक्रमे युवा उद्योजक केदार झाड, सरपंच भगवान लुडबे, सदाशिव गवस, उपसरपंच प्राची माणगावकर, तेजस लुडबे, अजय जोशी, बबन गावकर, विनोद सातार्डेकर यांनी पुरस्कृत केली आहेत. याशिवाय उत्कृष्ट पखवाज, हार्मोनियम, तबला, झांज, कोरस, उत्कृष्ट भारुड अशी वैयक्तिक स्वरूपाची बक्षिसे देण्यात येणार आहेत. स्पर्धेच्या सुरुवातीला गांगेश्र्वर कृपा भजन मंडळ श्रावण यांनी आपले सुश्राव्य भजन सादर केले. दि. १२ रोजी श्री देवी प्रासादिक भजन मंडळ भोगवे, श्री सद्गुरू संगीत भजन मंडळ कुडाळ, श्री महापुरुष भजन मंडळ मांडकुली, श्री विश्वकर्मा प्रासादिक भजन मंडळ राठीवडे, याची भजने सादर झाली. दिनांक १९ रोजी श्री गवळदेव प्रासादिक भजन मंडळ कुडाळ, श्री कोटेश्वर प्रासादिक भजन मंडळ कणकवली, श्री विठ्ठल रखुमाई भजन मंडळ आंदुर्ले, श्री विश्वकर्मा भजन मंडळ भरनी, श्री रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ कुडाळ. दिनांक २६ रोजी श्री स्वरशक्ती साधना भजन मंडळ काळसे, श्री पेडलकर प्रासादिक भजन मंडळ देवगड, श्री लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळ असरोंडी, श्री मूळपुरुष प्रासादिक भजन मंडळ तुळस, श्री विमलेश्र्वर प्रासादिक भजन मंडळ देवगड यांची भजने सादर होणार आहेत. दिनांक २ सप्टेंबर रोजी स्थानिक भजने, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कीर्तन व पारितोषिक वितरण आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.