मालवणात १९ ऑगस्टला महिलांची राज्यस्तरीय नारळ लढवण्याची स्पर्धा ; स्पर्धेचे दहावे वर्ष
ठाकरे गट आ. वैभव नाईक व सौ. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळ यांचे आयोजन ; लाखोंच्या बक्षीसांची उधळण ; येत्या दोन ते तीन दिवसात सविस्तर रूपरेषा जाहीर होणार
मालवण | कुणाल मांजरेकर
नारळी पौर्णिमे निमित्त मालवणात सौ. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळाच्या वतीने गेली दहा वर्षे घेण्यात येणारी आणि राज्यस्तरावर पोहचलेली महिलांसाठी नारळ लढविणे स्पर्धा यावर्षीही मालवण बंदर जेटी येथे होणार आहे. यासाठी जागेची पाहणी व निश्चिती करण्यात आली आहे. यावर्षीही या स्पर्धेत लाखो रुपयांच्या बक्षीसांचा वर्षाव होणार आहे, अशी माहिती सौ. शिल्पा खोत यांनी मालवण बंदर जेटी येथे बोलताना सांगितले.
नारळी पौर्णिमेनिमित्त मालवण मधील सौ. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळाच्यावतीने होणाऱ्या महिलांसाठी नारळ लढविणे स्पर्धेच्या आयोजनासाठी मालवण बंदर जेटी येथे आज जागेची पाहणी करण्यात आली. नवीन बंदर जेटीवर टर्मिनलच्या बाजूला ही स्पर्धा दि. १९ ऑगस्ट रोजी होणार आहे. यावेळी शिल्पा खोत यांच्यासमवेत यतीन खोत, मंदार केणी, दीपा शिंदे, रश्मी परुळेकर, नंदा सारंग, निकिता तोडणकर, श्रद्धा पेडणेकर, चारुशीला आढाव, रूपा कांदळगावकर, स्वाती तांडेल, स्नेहा कुडाळकर, प्रियांका लाड, तन्वी भगत, चित्रा सांडव, स्वाती तांडेल, ज्योती तोडणकर, श्वेताली पारटे, भाग्यश्री फोंडबा, दीपा पवार, तनिष्का खोत आदी उपस्थित होते. यावेळी शिल्पा खोत म्हणाल्या, या स्पर्धेसाठी आम. वैभव नाईक व ठाकरे शिवसेनेचे दरवर्षी सहकार्य लाभते. तसेच मित्रमंडळातील सर्व महिला व युवतींच्या सहकार्याने ही स्पर्धा यशस्वी होते. यावर्षीही ही स्पर्धा भव्य दिव्य स्वरूपात होणार असून स्पर्धेची रूपरेषा व बक्षिसे येत्या दोन दिवसात जाहीर करण्यात येणार आहे, असेही त्या म्हणाल्या.