जिल्हा बँक निवडणूकीच्या रंगीत तालमित भाजपची महाविकास आघाडीवर मात !

मठबुद्रुक सोसायटीच्या निवडणूकीत १३ पैकी १२ जागा भाजप पुरस्कृत पॅनलकडे

माजी खासदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा

उपसभापती राजू परूळेकर, अनंत राऊत ठरले विजयाचे शिल्पकार ; ग्रामस्थांचे मानले आभार

कुणाल मांजरेकर

जिल्हा बँक निवडणूकीचे पडघम सुरू झाले आहेत. जिल्हा बँक आपल्याकडे राखण्यासाठी भाजप आणि महाविकास आघाडी मध्ये चुरस निर्माण झाल्याचे चित्र असतानाच जिल्हा बँक निवडणूकीची मालवण तालुक्यात रंगीत तालीम म्हणून पाहिल्या गेलेल्या मठबुद्रुक विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणूकीत भाजपने महाविकास आघाडीला चितपट केले आहे. येथील १३ पैकी १२ जागांवर भाजप पुरस्कृत उमेदवार निवडून आले आहेत. या निवडणुकीसाठी भाजप नेते, माजी खासदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपसभापती राजू परुळेकर, माजी शिक्षण सभापती अनंत राऊत, बाळा राऊत आदींनी नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा राबवली. हा विजय ग्रामस्थांचा असून ग्रामस्थांनी आपल्याला दिवाळीची भेट दिली आहे, अशी प्रतिक्रिया राजू परुळेकर यांनी दिली आहे.

या निवडणुकीसाठी भाजप आणि महाविकास आघाडीने प्रतिष्ठा पणाला लावली होती. मात्र सहकार स्तरावरील तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या या निवडणुकीत भाजपने विजयी झेंडा फडकवला आहे. या निवडणुकीतील विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे – सर्वसाधारण गट : विठोबा गुणाजी बागवे, भानुदास चंद्रकांत गायकवाड, बाबुराव विनायक जंगले, अशोक शशिकांत कांदळकर, गुरुदेव शिवराम केळुसकर, उमाजी बाबाजी मालप, भानुदास आत्माराम येरम, महिला प्रतिनिधी : सुनीता शशिकांत बागवे, सावित्री शशिकांत कांदळकर, अनुसुचित जाती : महादेव विष्णू पाताडे, भटक्या विमुक्त जमाती : सोनू विजू जंगले, इतर मागास प्रतिनिधी : सुभाष परशुराम मांजरेकर हे उमेदवार विजयी झाले. सर्व विजयी उमेदवारांचे भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनीही अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. चिंदरकर यांनीही या निवडणुकीत लक्ष दिले होते. तर उपसभापती राजू परुळेकर यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची होती. सोसायटी निवडणुकीतील विजय हा ग्रामस्थांनी उपसभापती राजू परुळेकर यांना दिवाळी पूर्वीच दिलेली दिवाळी भेट ठरली आहे.

7

हा विजय शेतकऱ्यांचा : उपसभापती राजू परुळेकर

हा विजय येथील शेतकऱ्यांचा आहे. असे सांगत उपसभापती परुळेकर यांनी विजयाचे श्रेय मठ बुद्रुक, निरोम व बुधवळे गावातील ग्रामस्थ व सोसायटी सभासदांना दिले आहे. माजी शिक्षण सभापती अनंत राऊत, जनार्दन सावंत, प्रशांत परब, जिब्बा पाटील, मंगेश राऊत, भाई घाडी, निलेश बाईत, गुरू घाडी, सरपंच उमेश मांजरेकर, रवी घाडी, बाळा वेंगुर्लेकर, प्रकाश मुणगेकर, बाळा राऊत, अमित मेस्त्री, अनिल गावडे, उत्तम मल्हार, जानू जंगले, गुरू शिर्वेकर, बंडू बिर्जे, बाबू बाईत, जिजी केळुसकर, राजू मुणगेकर, सिद्धेश परुळेकर, बापट,कदम व अन्य ग्रामस्थ यांच्या सहकार्याने सोसायटीतील विजय शक्य झाल्याचे उपसभापती राजू परुळेकर यांनी सांगितले.

महाविकास आघाडी कडून नेत्यांची फौज !

या निवडणूकीत विजयी होणारे पॅनल आगामी जिल्हा बँक निवडणूकीत मतदानाचा दिलेला अधिकार बदलू शकते. त्यामुळे महाविकास आघाडीचे अनेक नेते या निवडणुकीत प्रचारासाठी दाखल झाले होते. यामध्ये आ. वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, संचालक व्हिक्टर डॉन्टस, विलास गावडे व इतरांचा समावेश होता. तर भाजपच्या वतीने फक्त तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर आणि सरचिटणीस महेश मांजरेकर हे दोघेजणच प्रचारात सहभागी झाले होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!