देवलीतून बेपत्ता तरुण अखेर सापडला ; मोबाईल लोकेशनद्वारे शोध

आर्थिक चणचण, कर्जाच्या नैराश्यामुळे सोडलं होतं घर ; पत्नी, मुलाची आठवण आल्याने घरी परतण्याचा निर्णय

कुणाल मांजरेकर

मालवण : वरची देवली येथून बुधवारी बेपत्ता झालेला सिद्धार्थ विष्णू चव्हाण (वय – ३१) हा तरुण शुक्रवारी सकाळी सापडून आला आहे. मोबाईल लोकेशनद्वारे पोलिसांनी त्यांचा शोध घेतल्यानंतर हडी – कालावल मार्गावर तो मिळून आला आहे. आर्थिक चणचण आणि कर्जाच्या नैराश्यामुळे त्याने घर सोडले होते. मात्र पत्नी आणि लहान मुलाची आठवण आल्याने त्याने घरी परतण्याचा निर्णय घेतला.

सिद्धार्थ हा बुधवार २० ऑक्टोबर पासून युनिकॉन मोटरसायकल घेऊन घरातून बेपत्ता झाला होता. याबाबत नातेवाईकांनी गुरुवारी मालवण पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी मोबाईल लोकेशन आधारे शोध घेतला असता गुरुवारी सकाळी चिपळूण येथे त्याचे मोबाईल लोकेशन सापडले होते. त्यानंतर त्याचा मोबाईल स्विचऑफ असल्याने पोलिसांना लोकेशन मिळत नव्हते. दरम्यान वरिष्ठ अधिकारी यांच्या परवानगीने मालवण पोलिसांचे पथक डी. जानकर, भगवान खोत, संतोष पुटवाड आदी सिद्धार्थ याच्या शोधार्थ रवाना झाले होते. नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी पोलिसांनाही माहिती देण्यात आली होती. शुक्रवारी सकाळी सिद्धार्थ याचे मोबाईल लोकेशन पोलिसांनी तपासले असता ते कणकवली, रामगड दिसून आले. सिद्धार्थ याचा मित्रपरिवार तात्काळ मालवण आचरा मार्गावर रवाना झाला. या दरम्यान हडी कालावल मार्गावर सिद्धार्थ हा मोटरसायकलसह सापडून आला. त्याला मालवण पोलीस ठाणे येथे आणून सहायक पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण, पोलीस निरीक्षक एस एस ओटवणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जबाब नोंद करत त्याला सोडून देण्यात आले.

आर्थिक चणचण आणि कर्जामुळे सोडले घर

सिद्धार्थ याने पोलिसांना दिलेल्या जबाबात आर्थिक चणचण, कर्ज असल्यामुळे आपण नैराश्याने घरातून निघून गेलो. मोटरसायकलने चिपळूण पर्यत प्रवास केला. पुढे बसने पनवेल पर्यत गेलो. त्या दरम्यान पत्नी व छोट्या मुलाची आठवण येत असल्यामुळे पुन्हा माघारी परतण्याचा निर्णय घेतला. पनवेल ते चिपळूण पर्यत खाजगी बसने माघारी आलो. तिथून मोटरसायकलने आलो. प्रवासादरम्यान चहा व वडापाव खाल्ला, असे सिद्धार्थ याने सांगितल्याची माहिती पोलीस निरीक्षक एस. एस. ओटवणेकर यांनी सांगितले.
Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!