मालवणच्या हॉटेल दर्यासारंग येथे बीचटेनिस कार्यशाळा संपन्न
आंतरराष्ट्रीय खेळाडू विश्वजित सांगळे, उन्नत सांगळे यांची उपस्थिती ; टोपीवाला हायस्कुलच्या ४४ खेळाडूंनी घेतला लाभ
मालवण | कुणाल मांजरेकर
येथील दर्यासारंग बीचरिसोर्ट येथे बीच टेनिस खेळाची एकदिवशीय कार्यशाळा रविवारी संप्पन झाली. बीच टेनिस हा विदेशात मोठ्या प्रमाणावर खेळला जाणारा खेळ आहे. हा खेळ खेळणारे भारतात मोजकेच खेळाडू आहेत. या खेळाडूंपैकी ऐस्परर या स्पोर्ट्स मॅनेजमेंट कंपनीचे सीईओ आणि बीच टेनिस आणि लॉन टेनिसचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू विश्वजीत सांगळे यांच्या कंपनी मार्फत या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बीच टेनिस फेडरेशन इंडियाचे उपाध्यक्ष तसेच बीच टेनिस राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू उन्नत सांगळे हे देखील उपस्थित होते. टोपीवाला हायस्कूलच्या ४४ विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला.
यावेळी या खेळाडूना या खेळाची माहिती आणि प्रत्यक्ष खेळाची संधी देण्यात आली. या सहभागी सर्व खेळाडूना ऐस्परर या कंपनीकडून सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. या कार्यक्रमासाठी टोपीवाला हायस्कूलचे सामंत सर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, सचिव विजय कामत आणि क्रीडा शिक्षक वारंग सर, दर्यासारंगच्या प्रोप्रायटर स्मृती कांदळगांवकर, या कार्यक्रमाच्या समन्वयक काजल कांदळगांवकर, वेदांत पोवळे, शंभावी हातखंबकर उपस्थित होते.
या कार्यशाळेचे आयोजन टोपीवाला हायस्कूलची माजी विद्यार्थिनी आणि ऍस्परर कंपनीची सभासद काजल महेश कांदळगांवकर हिच्या पुढाकाराने करण्यात आले होते. आता प्राथमिकरित्या एका शाळेतर्फे थोडक्यात याचे आयोजन करण्यात आले आहे. भविष्यात सर्व शाळासाठी ही कार्यशाळा आयोजित केली जाईल, असे बीच टेनिस इंडियाचे उपाध्यक्ष उन्नत सांगळे यांनी सांगितले. विदेशात सात देशांमध्ये लॉन टेनिस विजेता विश्वजीत सांगळे आणि बीच टेनिस चा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू उन्नत सांगळे यांनी मालवण सारख्या छोट्या शहरामुळे येऊन या कार्यशाळेचे आयोजन केल्याबद्दल टोपीवाला हायस्कूलचे सामंत यांनी त्यांचे आभार मानले. यावेळी मालवण वासियांच्या वतीने या दोन्ही खेळाडूना शाल आणि श्रीफळ देवून त्यांचा गौरव करण्यात आला.