मालवणात उत्तम दर्जाचे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारणार ; निलेश राणेंचा शब्द
“खेलो इंडिया” मध्ये देशातील १३ खेळाडूंमध्ये निवड झालेल्या मालवणच्या टेबल टेनिस आणि बॅडमिंटन खेळाडूंच्या प्रशिक्षकांचा निलेश राणेंच्या हस्ते सत्कार
मालवणात पाच वर्षांपूर्वी गाजावाजा करून स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स भूमिपूजन, पण अद्याप इमारतीचा पाया देखील रचला गेला नाही : प्रशिक्षकांनी मांडली व्यथा
स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारण्यासाठी “स्पोर्ट्समन आमदार” हवा, तुमचा प्रश्न नक्कीच सोडवणार : निलेश राणे यांची ग्वाही : अत्यावश्यक साहित्य स्वखर्चाने देणार
मालवण | कुणाल मांजरेकर
केंद्र सरकारच्या खेलो इंडिया मध्ये टेबल टेनिस आणि बॅडमिंटन क्रीडा प्रकारात देशातून प्रत्येकी १३ खेळाडूंची पुढील प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. यामध्ये मालवण मधील टेबल टेनिसच्या तीन तर बॅडमिंटनच्या एका अशा चार जणांचा समावेश आहे. या खेळाडूंना घडवणारे प्रशिक्षक महेश परब तसेच सुजन परब आणि चंद्रकांत साळवे यांचा भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख, माजी खासदार निलेश राणे यांनी रविवारी सत्कार केला. यावेळी या प्रशिक्षकांनी मालवणात बॅडमिंटनसाठी कोर्ट तसेच टेबल टेनिस साठी आवश्यक सामुग्री नसल्याची खंत व्यक्त केली. मालवणात पालिकेच्या वतीने स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारण्यासाठी मोठा गाजावाजा करून इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. पण पाच वर्षात पायाचा एक दगड देखील उभा राहिला नाही, त्यामुळे प्रतिभावान खेळाडूंचे नुकसान होत असल्याचे या प्रशिक्षकांनी सांगितले. यावर नगरपालिकेत हे काम कुठे अडकलेय याची माहिती घेऊन मालवणात दर्जेदार स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारण्याची ग्वाही देतानाच बॅडमिंटन तसेच टेबल टेनिससाठी आता गरजेचे असलेले कोर्ट आणि मॅट आपण स्वखर्चाने देतो, असे निलेश राणे म्हणाले.
खेलो इंडिया मध्ये बॅडमिंटन प्रकारात गौरव राजेश पराडकर तर टेबल टेनिस मध्ये आदेश पंकज पेडणेकर, प्रत्युष प्रकाश शेट्टीकर आणि रौनत विलास कांबळी या मालवण मधील चार खेळाडूंची पुढील प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. देशात निवडलेल्या दोन्ही खेळांच्या १३ स्पर्धकांमधून ही निवड झाली असून या खेळाडूंचे प्रशिक्षक महेश परब, सुजन परब (बॅडमिंटन), चंद्रकांत साळवे (टेबल टेनिस) यांचा भाजपचे मालवण शहर अध्यक्ष बाबा मोंडकर यांच्या संकल्पनेतून भाजपाच्या मालवण कार्यालयात माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, बाबा मोंडकर, सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, अशोक तोडणकर, विकी तोरसकर, वसंत गांवकर, राजु बिडये, ललित चव्हाण, राकेश सावंत, निषय पालेकर, महेश सारंग, आबा हडकर यांसह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
बॅडमिंटन, टेबलटेनिस या क्रीडा प्रकारात मालवणातील अनेक खेळाडू राज्य व राष्ट्रीय स्तरावर सातत्याने प्रतिनिधित्व करतात. मात्र या खेळाडूंना अधिक चांगल्या प्रकारे प्रशिक्षण देता यावे यासाठी मालवण शहरात बॅडमिंटन कोर्ट, टेबल टेनिस टेबल्स यासह सुसज्ज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारणी झाल्यास अधिक दर्जेदार खेळाडू घडतील. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारणीची व्हावी. अशी मागणी बॅडमिंटन व टेबलटेनिस प्रशिक्षकांच्या वतीने निलेश राणे यांच्याकडे करण्यात आली. त्याला निलेश राणे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.