आयुष्यात खूप मोठे व्हा, स्वत:बरोबर देशाचेही नाव उज्ज्वल करा 

मुख्याधिकारी संतोष जिरगे यांचे आवाहन ; मालवण नगरपालिकेच्या वतीने दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

मालवण | कुणाल मांजरेकर

दहावीचा निकाल हा आयुष्यातील खूप महत्वाचा टप्पा असला तरी आपल्याला मिळणारे संस्कारच भविष्यातील वाटचालीला उपयुक्त ठरतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपला गुरु निश्चित करून त्याच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीतेकडे वाटचाल करा. मोबाईलचा अतिरेक टाळून खूप अभ्यास करून आयुष्यात खूप मोठे व्हा आणि स्वतः बरोबरच आपल्या देशाचे नाव मोठे करा, असे प्रतिपादन मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी येथे बोलताना केले.

मालवण नगरपालिकेच्या वतीने गुरुवारी शहरातील दहावीच्या गुणवंत मुलांचा सत्कार सोहळा पालिका सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल देसाई, नितीन वाळके यांच्यासह महेश परब, सोनाली हळदणकर, आनंद म्हापणकर, दिनेश राऊत, राजा केरीपाळे यांच्यासह पालिकेचे अन्य अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी मुख्याधिकारी जिरगे यांनी मालवण शहरातील शाळांनी दहावीत आपल्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखल्याबद्दल कौतुक केले. पालिकेत कर्मचारी संख्या कमी असल्याने कामाचा अतिरिक्त ताण असताना देखील कर्मचाऱ्यांनी मेहनत घेऊन अल्प काळात गुणवंत मुलांचा सत्काराचा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी घेतलेल्या मेहनतीचे देखील त्यांनी कौतुक केले. दहावीच्या मुलांनी मिळवलेले गुण अतिशय महत्वाचे आहेत, याला दाद नाही. तुम्ही कौतुकास पात्र आहात. तुमच्या सोबतच तुम्हाला घडवणारे पालक आणि दिशा देणारे शिक्षक हे देखील कौतुकाला पात्र आहेत. दहावीचा टप्पा म्हणजे जीवनाची खरी सुरुवात आहे. त्यामुळे शिक्षण घेतानाच आयुष्यात एक चांगला माणूस बनण्याचे ध्येय ठरवा. दहावीचे यश महत्वाचे असले तरी या गुणांवर तुमचं करिअर ठरत नाही. त्यासाठी संस्कार महत्वाचे आहेत, असे ते म्हणाले.

पत्रकार प्रफुल्ल देसाई यांनी दहावीचा निकाल लागल्यावर अवघ्या दोन नगरपालिकेने गुणवंत मुलांचा सत्कार केला आहे, त्याबद्दल मुख्याधिकारी आणि त्यांचे सहकारी कौतुकास पात्र आहेत, असे सांगून पूर्वी दहावी, बारावी ही अडथळ्याची शर्यत मानली जात होती. पण आता तशी परिस्थिती राहिली नाही. आज गुणवत्ता पातळी वाढली आहे. सिंधुदुर्गात कमतरताना नाही. मात्र येथील विद्यार्थी आयपीएस, आयएएस कडे वळत नाहीत ही खेदाची बाब असल्याचे ते म्हणाले. विद्यार्थ्यानी डॉक्टर, वकील, इंजिनिअरिंग कडे वळताना स्पर्धा परीक्षेकडे देखील वळले पाहीजे. प्रत्येकाने आपल्याला भविष्यात काय बनायचे आहे, ते आताच ठरवावे, असे आवाहन श्री. देसाई यांनी केले.

यावेळी नितीन वाळके यांच्यासह गुणवंत विद्यार्थी, शिक्षक, पालक यांनीही आपले विचार मांडले. सूत्रसंचालन खेमराज सावंत यांनी करून आभार मानले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!