भरधाव मोटरसायकलची एसटी बसला धडक : दोघांचा मृत्यू, एकजण गंभीर

आनंदव्हाळ येथील भगवती हॉटेल नजिकच्या वळणावर अपघात 

मालवण : मालवणच्या दिशेने येणाऱ्या एसटी बसला समोरून येणाऱ्या मोटारसायकलने धडक देऊन झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. बुधवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास आनंदव्हाळ येथील भगवती हॉटेल नजिकच्या वळणावर हा अपघात घडला. या अपघाताची नोंद मालवण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे, अशी माहिती मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली.

मालवण पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, मालवण कसाल मार्गावर आनंदव्हाळ भगवती हॉटेल नजीक वळणावर मालवणच्या दिशेने येणाऱ्या रत्नागिरी मालवण (एमएच 20 बीएल 3185) या बसला समोरून भरधाव वेगात येणाऱ्या मोटरसायकल (एमएच 07 एक्यू 2568) ची धडक बसली. एसटी बसला एका बाजूला धडक देऊन मोटरसायकल रस्त्यावर कोसळली. मोटरसायकलवर बसलेले तिघेही जण रस्त्यावर कोसळले. एसटी चालक, वाहक तसेच स्थानिक ग्रामस्थ यांनी धाव घेतली. रुग्णावाहिकेला बोलावून रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमीना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मालवण पोलीस व एसटी प्रशासन अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अपघाताचा पंचनामा करण्यात आला. 

गंभीर जखमी मोटरसायकल चालक गणेश कृष्णा निकम (वय 30, रा. पोईप) यांचा बुधवारी रात्री उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर अन्य एक गंभीर जखमी राकेश पवार (वय 30, रा. कुंभारमाठ) याचा गुरुवारी सकाळी मृत्यू झाला. सुनील शिवराम पवार (वय 25,रा. कोटकमटे ता. देवगड) या जखमी तरुणावर गोवा येथे उपचार सूरू आहेत. अशी माहिती मालवण पोलिसांच्या वतीने देण्यात आली. भरधाव वेगात मोटरसायकल चालवून अपघातात स्वतःच्या मृत्यूस तसेच मोटरसायकल वरील अन्य एका व्यक्तीच्या मृत्यूस व मोटरसायकल वरील अन्य एका व्यक्तीच्या गंभीर दुखापतीस कारणीभूत ठरल्या प्रकरणी मोटरसायकल चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालवण पोलीस अधिक तपास करत आहेत. 

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3529

Leave a Reply

error: Content is protected !!