मालवण शहरातील वाहतूक कोंडीवर सुयोग्य नियोजन करा ; अनधिकृत पार्किंगला आळा आणावा

माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर, दीपक पाटकर यांच्यासह भाजपाच्या शिष्टमंडळाची पोलीस निरीक्षकांशी चर्चा 

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण शहरात मोठया संख्येने पर्यटक दाखल होत असून शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडीचा त्रास वाहन चालकांना सहन करावा लागत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी सुयोग्य नियोजन करण्यात यावे, अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर यांच्यासह भाजपाच्या शिष्टमंडळाने पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्याकडे केली आहे. 

निवडणुकांचा चौथा टप्पा पार पडल्यानंतर पर्यटकांचा ओढा मालवण, तारकर्ली, देवाबागकडे वळला आहे. शहरात मोठया प्रमाणात पर्यटकांची वाहने दाखल झाल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला असून बस स्थानकासह बाजारपेठ, भरडनाका येथे वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसून येत आहे. बस स्थानक नजीकच्या रस्त्यावर खासगी ट्रॅव्हल्स पार्किंग करण्यात येत असल्याने याठिकाणी अनेकदा वाहनांना अडथळा निर्माण होतो. यातून काहीवेळा वादावादीच्या घटना देखील घडतात. काही पर्यटक येथे आपली खासगी वाहने पार्किंग करून अन्यत्र जात असल्याने देखील वाहतूक कोंडीचा प्रकार घडतो. त्यामुळे खासगी ट्रॅव्हल्सचे पार्किंग नगरपालिकेच्या पार्किंगमध्ये अथवा देऊळवाडा सागरी महामार्गांवर करण्यात यावे अशी सूचना भाजपाच्या शिष्टमंडळाने पोलीस निरीक्षकांकडे केली. याबाबत संबंधिताना सूचना देण्यात येतील, असे पोलीस निरीक्षक कोल्हे यांनी सांगितले.

शहरातील फोवकांडा पिंपळ येथून पर्यटक बंदर जेटीकडे एकदिशा मार्गाने येत असतात. तसेच बंदर जेटीकडून बाजारपेठेत एकदिशा मार्गाने पर्यटकांच्या गाड्या आल्याने या मार्गातील वाहतूक ठप्प होते. त्यामुळे येथे वाहतूक पोलीस उपलब्ध करून देण्यात यावा तसेच स्वामी हॉटेल ते भंडारी हायस्कुल मार्गांवर वाहनांना प्रतिबंध करण्यात यावा, अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी भाजपाच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला सर्वतोपती सहकार्य करण्याची ग्वाही यावेळी देण्यात आली. यावेळी भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष मंदार लुडबे, राजू बिडये, भाई मांजरेकर, कमलाकर कोचरेकर, संदीप मालंडकर आदी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3529

Leave a Reply

error: Content is protected !!