नांदरुख ग्रा. पं. वर भाजपाची सत्ता ; सरपंच, उपसरपंच गावपॅनलसह ग्रामस्थांचा भाजपात प्रवेश

भाजपचे नेते निलेश राणे, दत्ता सामंतांची प्रमुख उपस्थिती : महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना गावातून ७५ ते ८० % मतदान देण्याचा निर्धार

गावातील रस्ते, पाण्याचे प्रश्न सोडवण्यात ठाकरे गटाला अपयश आल्यानेच भाजपासोबत जाण्याचा निर्णय : सरपंच भाऊ चव्हाण यांची माहिती

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण तालुक्यातील नांदरुख ग्रामपंचायतीचे सरपंच रामचंद्र उर्फ भाऊ चव्हाण, उपसरपंच दशरथ पोखरणकर यांच्यासह गावपॅनलचे सदस्य आणि ग्रामस्थांनी भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे, भाजपचे प्रांतिक सदस्य दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी भाजपात प्रवेश केला. यापूर्वी या गावावर शिवसेना ठाकरे गटाची सत्ता होती. मात्र येथील रस्ते, पाणी आणि विकासाचे मूलभूत प्रश्न सोडवण्यात ठाकरे गटाला अपयश आल्याने हा गाव भाजपमय केल्याची प्रतिक्रिया सरपंच भाऊ चव्हाण यांनी व्यक्त करत लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना ७५ ते ८० % मतदान देण्याचा निर्धार यावेळी केला. दरम्यान, भाजपाच्या माध्यमातून येथील विकासाचे प्रश्न निश्चितपणे सोडवले जातील, अशी ग्वाही निलेश राणे यांनी दिली.

नांदरुख गावावर यापूर्वी शिवसेना ठाकरे गटाची सत्ता होती. मात्र मागील वर्षी झालेल्या ग्रा. पं. निवडणुकीत या गावावर गावपॅनलची सत्ता आली होती. या पॅनल मधील सरपंच रामचंद्र उर्फ भाऊ चव्हाण, उपसरपंच दशरथ पोखरणकर यांच्यासह गावपॅनलचे सदस्य नम्रता चव्हाण, समीक्षा चव्हाण, राजश्री कांबळी यांनी मंगळवारी निलेश राणे, दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी ग्रामस्थांनी देखील भाजपात प्रवेश केला आहे. यावेळी चौकेचे माजी सरपंच राजा गावडे, भाजपाचे जिल्हा प्रवक्ते बाबा मोंडकर, श्री. भोसले, मंदार लुडबे, रमेश चव्हाण, सागर चव्हाण, सत्यविजय कांबळी, चंद्रकांत चव्हाण, नंदू चव्हाण, सुरेश साळकर, राजेश चव्हाण, बाबू मांजरेकर, अमित गावडे तसेच गावातील अन्य ग्रामस्थ, मानकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी सरपंच भाऊ चव्हाण यांनी आजपासून हा गाव भाजपमय झाल्याचे सांगितले. या गावातील 100 टक्के मतदान यापूर्वी दादांना होत असे. मात्र कालांतराने याठिकाणी दोन गट पडून मतांची विभागणी झाली. त्यामुळे रस्ते, पाणी या विकासापासून हा गाव वंचित राहिला आहे. त्यामुळे गावच्या विकासासाठी आम्ही भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आपण एकसंघ राहिलो तरच विकास होणार आहे. गावात पावणे दोन कोटीचा पाण्याचा प्रकल्प आला. मात्र तरीही गावात एकही पाण्याची विहीर नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

यावेळी दत्ता सामंत यांनी गावातील विकासाचे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. या गावातून दादांना किमान ७५ टक्के मतदान द्या. येथील पाण्याचा आणी रस्त्याचा प्रश्न सोडवण्यात येईल, असे ते म्हणाले. राणे साहेबांनी या गावात अनेक कामे केली. मात्र मागील दहा वर्षे ही ग्रामपंचायत उबाठा कडे गेल्यावर हा गाव विकासा पासून वंचित राहिल्याचे त्यांनी सांगितले.

तर निलेश राणे यांनी देखील विकासाचे प्रश्न सोडवण्याची ग्वाही दिली. आपल्या विकासाच्या अपेक्षा मार्गी लावू असे ते म्हणाले. यावेळी दत्ता सामंत यांचे देखील त्यांनी कौतुक केले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!