ठाकरे गटाचा बुरुज ढासळला ; वायंगणी सरपंचांसह ग्रामस्थांचा शेकडोंच्या संख्येने भाजपात प्रवेश

भाजपचे नेते निलेश राणे, प्रांतिक सदस्य दत्ता सामंत यांची उपस्थिती ; ग्रामस्थांचा प्रतिसाद पाहून निलेश राणेही भारावले

ग्रामस्थांना नको असेल तर सी वर्ल्ड प्रकल्पाला लाथ मारणारा पहिला निलेश राणे असेल ; विरोधकांनी आता दिशाभूल थांबवून गावच्या रखडलेल्या विकासावर बोलावे : निलेश राणे

मालवण | कुणाल मांजरेकर

मागील दहा वर्षे ठाकरे गटाचा अभेद्य बुरुज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालवण तालुक्यातील वायंगणी गावात भाजपचे कुडाळ मालवण प्रमुख निलेश राणे आणि प्रांतिक सदस्य दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली भगदाड पाडण्यात भाजपला यश आले आहे. येथील ठाकरे गटाचे सरपंच रुपेश पाटकर यांच्यासह शेकडो ग्रामस्थांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करीत भाजपचा झेंडा हाती घेतला. यावेळी ग्रामस्थांची उपस्थिती पाहून स्वतः निलेश राणे देखील भारावून गेले. विरोधकांनी केवळ सी वर्ल्ड प्रकल्पावरून राजकारण करून ग्रामस्थांची माथी भडकवत स्वतःचा फायदा करून घेतला. मागील दहा वर्षांपैकी साडेसात वर्षे येथील आमदार, खासदार सत्तेत होते. त्यातील अडीच वर्षे उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री होते. मग त्यांनी सी वर्ल्डची अधिसूचना रद्द का केली नाही ? प्रकल्पाला विरोध करताना येथील विकासाचे प्रश्न तसेच ठेवले. आजही याठिकाणी येताना अरुंद रस्त्याचा त्रास सहन करावा लागतो. ही कामे ठाकरे गटाने मार्गी का लावली नाहीत ? असे सवाल निलेश राणे यांनी करून राणे साहेबाना हवा असता तर या दहा वर्षात त्यांनी सत्तेच्या माध्यमातून सी वर्ल्ड प्रकल्प रेटून नेला असता. पण एकाही ग्रामस्थांचा विरोध असेल तर हा प्रकल्प मी आणणार नाही, अशी भूमिका राणेसाहेबांनी घेतली आहे. यानंतरच्या काळात देखील ग्रामस्थांना नको असेल तर या सी वर्ल्ड प्रकल्पावर लाथ मारणारा निलेश राणे हा पहिला व्यक्ती असेल, अशी ग्वाही निलेश राणे यांनी यावेळी दिली.

मालवण तालुक्यातील वायंगणी गावात मुरवणे हॉल मध्ये भाजपचे कुडाळ मालवण प्रमुख निलेश राणे आणि प्रांतिक सदस्य दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश कार्यक्रम मंगळवारी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. यावेळी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष राजन गावकर, संतोष कोदे, मंगेश गावकर, आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस, उपसरपंच संतोष मिराशी, मालती जोशी, अर्चना सावंत, दीपक सुर्वे, मनोज हडकर, उमेश सावंत, शिवसेना पदाधिकारी संजय सावंत, दीपक पाटकर, राजा गावडे, हनुमंत प्रभू यांच्यासह भाजपचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. 

विनायक राऊत, वैभव नाईक विकास करण्यात अपयशी : दत्ता सामंत

येथील आमदार वैभव नाईक आणि खासदार विनायक राऊत हे गेल्या दहा वर्षात गावात साधी पायवाट बनवू शकले नाहीत, गणपती विसर्जन घाट बांधू शकले नाहीत. ब्राम्हण तळीकडे संरक्षक भिंत उभारू शकले नाहीत. जनतेला पायाभूत सुविधा देण्यात हे अपयशी ठरले असून केवळ राणे साहेब सीवर्ल्ड गावात आणणार ही ओरड मारून जनतेची माथी भडकवण्याचे काम त्यांनी केले. मात्र लोकांचा विरोध असल्यानेच राणेसाहेबांनी हा प्रकल्प आणला नाही. एका गावातून मते नाही मिळाली म्हणून त्यांचे काही बिघडणार होते का ? पण ग्रामस्थांच्या बाजूने ते ठामपणे उभे राहिले. या गावात आज ठाकरे गटाची सत्ता आहे, पण येथील विकास कामे मार्गी लावण्यात ते अपयशी ठरल्यानेच येथील सरपंचांनी आज भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे दत्ता सामंत यांनी सांगून गावा तून नारायण राणे यांना अपेक्षित मताधिक्य दिल्यास येथील विकासकामे करण्यासाठी शासकीय निधीची वाट पाहणार नाही, असे त्यांनी सांगितले.

आमदार, खासदारांनी साडेसात वर्षात सी वर्ल्डचे नोटिफिकेशन रद्द का केलं नाही ?

यावेळी निलेश राणे म्हणाले, दहा वर्ष हा गाव आमच्यापासून दुरावला होता. या गावात विरोधकांनी सीवर्ल्ड वरून एक वेगळं वातावरण निर्माण केलं होतं. पण ग्रामस्थांचा विरोध असेल तर या प्रकल्पाला पहिली लाथ हा निलेश राणेच मारेल. या प्रकल्पाला विरोध करून फायदा कोणाला झाला ? फक्त उबाठाला. त्यामुळे ग्रामस्थांचा कोणताही फायदा झाला नाही. राणे साहेबाना जर हा प्रकल्प करायचा असता तर ते आणू शकले असते, असे सांगून मागील दहा वर्षांपैकी साडेसात वर्षे येथील आमदार, खासदार सत्तेत होते. मग त्यांनी सी वर्ल्ड चे नोटिफिकेशन रद्द का नाही केले, याचा जाब येथल्या जनतेने विचारावा. येथील सरपंचांनी गावाचा विकास कोण करू शकतो हे ओळखून आज भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा विकासाचा एकही शब्द आम्ही कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही निलेश राणे यांनी देऊन सरपंच रुपेश पाटकर यांच्या नेतृत्वाखाली येथील विकासाचे प्रश्न 100 % मार्गी लावू असे ते म्हणाले.

देशात मोदीसाहेब पंतप्रधान होणारच आहेत. त्यांना कोणी थांबवू शकत नाही. विरोधकच असा नाही. येथील खासदाराने साधा चपलेचा कारखाना सुद्धा टाकलेला नाही. मागची दहा वर्षे या खासदाराने फुकट घालवली.पण पुढची पाच वर्षे आपल्याला फुकट घालवायची नाहीत. येथे तरुण वर्ग आहे. त्यांच्या दोन हाताना काम देण्यासाठी येथील स्थानिकांना हवे असलेले उद्योगधंदे उभारून देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. पण त्यासाठी लोकसभेत राणे साहेबांसारखा रुबाबदार माणूस गेला पाहिजे, असे ते निलेश राणे म्हणाले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!