तारकर्लीच्या समुद्रात कागलचा युवक बुडाला ; शोध सुरु !
अन्य एका युवकावर मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचार ; मुरगूडच्या सायबर क्लासचे २० विद्यार्थी पर्यटनासाठी आले होते मालवणात
मालवण | कुणाल मांजरेकर
कोल्हापूर मधून मालवणात आलेल्या पर्यटकांच्या ग्रुप मधील एक युवक तारकर्लीच्या समुद्रात बुडून बेपत्ता झाल्याची दुर्घटना शुक्रवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास तारकर्ली पर्यटन केंद्रानजीकच्या समुद्रात घडली. आदित्य पांडुरंग पाटील (रा. बस्तवडे ता. कागल, कोल्हापूर) असे या युवकाचे नाव आहे. यावेळी समुद्रात उतरलेल्या तिघांना वाचविण्यात स्थानिकांना यश आले आहे. यातील अजिंक्य पाटील (रा. कौलंग ता. कागल, जि. कोल्हापूर) याच्यावर मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर समुद्रात बेपत्ता झालेल्या पर्यटकाचा स्थानिक मच्छीमार व स्कुबा डायव्हर यांच्या मदतीने उशिरापर्यंत शोध सुरू होता.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुरगूड कोल्हापूर येथील सारथी सायबर क्लासेसच्या २० विद्यार्थ्यांचा एक ग्रुप शुक्रवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास सिंधुदुर्गात पर्यटनासाठी निघाला. यामध्ये ८ मुलगे, १२ मुली आणि एका शिक्षिकेचा समावेश होता. दुपारी कुणकेश्वर येथे देवदर्शन केल्यानंतर जेवण करून ते साधारण ३.३० ते ४ वाजण्याच्या सुमारास तारकर्ली पर्यटन केंद्रा नजिकच्या समुद्रात आंघोळीसाठी उतरले. यात पाण्याचा अंदाज न आल्याने आदित्य पाटील हा बुडून बेपत्ता झाला. त्याच्यासोबत असलेले अजिंक्य पाटील (वय-२१) रा. कविलगे ता. कागल, जि. कोल्हापूर, प्रसाद चौगुले, रितेश वायदंडे रा. कविलगे, ता. कागल, जि. कोल्हापूर हे देखील बुडू लागले. हा प्रकार स्थानिकांच्या लक्षात येताच स्थानिकांनी समुद्रात धाव घेत या तिघांना किनाऱ्यावर आणले. यातील अजिंक्य पाटील हा अत्यवस्थ बनल्याने त्याला १०८ रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉ. स्वप्निल दळवी यांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी विलास टेंबुलकर, महादेव घागरे ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले होते. याबाबतचा अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
… अन् मोठ्या लाटेत आदित्य हातातून निसटला
यातील जखमी अजिंक्य पाटील याने दिलेल्या माहितीनुसार, आम्ही पाण्यात उतरल्यानंतर आदित्य आणि मी पाण्यात बुडू लागलो. त्याही परिस्थितीत मी त्याला ओढत पाण्याबाहेर घेऊन येत होतो. अचानक मोठी लाट आली आणि आदित्य हा माझ्या हातातून सटकला आणि पाण्यात बेपत्ता झाला. नाहीतर तो देखील सुखरूप आमच्या सोबत आला असता, असे त्याने सांगितले.