परप्रांतीय कामगारांचा जेसीबी, ट्रॅक्टर व डंपर व्यवसायात शिरकाव !

मालवणात स्थानिक व्यावसायिक आक्रमक ; दिला “सज्जड दम”: यापुढे मालवणात व्यवसाय करताना आढळल्यास योग्य ते उत्तर देणार

मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्याबाहेरील कामगारांनी स्थानिक जेसीबी, ट्रॅक्टर व डंपर व्यवसायात शिरकाव करून कमी दरात सेवा सुरु केल्याने स्थानिक जेसीबी ट्रॅक्टर व डम्पर व्यवसायिकांच्या व्यवसायास फटका बसत असल्याबाबत आज मालवणातील स्थानिक व्यवसायिकांनी या विरोधात आवाज उठवत संबंधित परजिल्ह्यातील या व्यवसायिकांना मज्जाव करत  यापुढे मालवणात जेसीबी, ट्रॅक्टर व डंपर व्यवसाय करू नये, व्यवसाय करताना आढळल्यास योग्य ते उत्तर दिले जाईल असा आक्रमक इशारा दिला.

मालवण मधील बांधकाम संबंधित व्यवसायात कर्नाटक, विजापूर येथील कामगारांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून यातीलच काही कामगारांनी आपल्या राज्यातील ट्रॅक्टर, जेसीबी व डंपर मालवणात आणून बांधकाम व इतर गोष्टीसाठी लागणारी सेवा देण्यास सुरुवात केली. ही सेवा देताना परप्रांतीय कामगार स्थानिक व्यवसायिकांपेक्षा कमी दर आकारत असल्याने स्थानिक व्यवसायिकांचा व्यवसाय धोक्यात आला आहे. याबाबत गेले काही दिवस स्थानिक व्यवसायिकांमध्ये धुसफूस सुरु असून या परप्रांतीय व्यवसायिकांना मज्जाव करण्याबाबत बैठका घेण्यात येत होत्या. यासाठी स्थानिक व्यवसायिकांनी एकत्र येऊन आपली संघटना देखील स्थापन करण्याचे ठरविले आहे. आज मालवण देऊळवाडा येथे स्थानिक व्यवसायिकांनी संबंधित परप्रांतीय व्यवसायिकांशी आमने सामने करत त्यांना खडे बोल सुनावले. यावेळी उद्योजक राजा गावडे, व्यावसायिक शैलेश नामनाईक, बाळा वस्त, दादा नाईक, राजू बिडये, बंडू वळंजू, श्रेयस माणगावकर, अक्षय माणगावकर, दत्ता गावडे, सुरज धुरी, सुरेश नाईक, दादा पालव, प्रसाद आडवणकर, हरीश गावकर, आरिफ शेख, प्रसाद मुंबरकर आदी व इतर व्यावसायिक उपस्थित होते.

यावेळी राजा गावडे व इतर व्यवसायिकांनी परप्रांतीय व्यवसायिकांशी चर्चा केली. कर्नाटक मधून कामगार म्हणून आलेल्या कामगारांनी स्थानिक जेसीबी, ट्रॅक्टर व डंपर व्यवसायात घुसखोरी करत तें आता मुकादम व व्यावसायिक बनले आहेत. हे व्यावसायिक कमी दराने सेवा देत असल्याने दरामध्ये तफावत होऊन स्थानिक व्यवसायिकांना कामे मिळेनाशी झाली आहेत. यामुळे स्थानिक व्यवसायिकांच्या पोटावर पाय आला असून या परप्रांतीयांना वेळीच रोखणे गरजेचे आहे असे राजा गावडे यांनी सांगत मालवणातील अशा परप्रांतीय व्यवसायिकांनी आपापले जेसीबी, ट्रॅक्टर व डंपर घेऊन आपले गाव गाठावे, असा निर्वाणीचा इशारा राजा गावडे यांनी दिला.

यावेळी शैलेश नामनाईक म्हणाले, जे परप्रांतीय व्यावसायिक जेसीबी,  ट्रॅक्टर, व डंपर द्वारे व्यवसाय करत आहेत त्या जेसीबी, ट्रॅक्टर, व डंपरची नोंदणी त्यांच्या राज्यात झालेली असून तें चुकीच्या पद्धतीने याठिकाणी व्यवसायासाठी वापरण्यात येत आहेत. या व्यवसायिकांमुळे स्थानिक व्यावसायिक अडचणीत आले असून यापूढे परप्रांतीय व्यावसायिक आम्हाला मालवणात दिसता नये, अन्यथा त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही आमच्या संघटनेत ठरल्याप्रमाणे करू. तसेच स्थानिक नागरिकांनी देखील स्थानिक व्यवसायिकांना प्राधान्य देऊन सहकार्य केले पाहिजे. त्याचप्रमाणे या विषयात कोणीही राजकारण न करता राजकीय पुढऱ्यांनी देखील स्थानिक व्यवसायिकांच्या पाठीशी राहावे, असेही श्री. नामनाईक म्हणाले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!