यंदा मालवणात सौरभ ताम्हणकर मित्रमंडळाची आगळी वेगळी नरक चतुर्दशी

भव्य नरकासुर स्पर्धेचे आयोजन ; पण नरकासुरा सोबत श्रीकृष्णाची वेशभूषा आवश्यक

प्रथम तीन विजेत्या क्रमांकांना रोख रक्कम, प्रमाणपत्र आणि आकर्षक भेटवस्तू

नरकासूर देखाव्यातून व्यसनमुक्ती, प्लास्टिक मुक्ती व महिला सुरक्षिततेचे संदेश देण्याचे आवाहन

मालवण | कुणाल मांजरेकर

भगवान श्रीकृष्णाने नरकासूराचा वध केला तो दिवस नरक चतुर्दशी म्हणून साजरा केला जातो. मात्र अलीकडच्या काळात होणाऱ्या भव्य नरकासुर प्रतिमांमुळे कृष्ण महिमा दुर्लक्षित झाला आहे. मात्र युवा पिढीला नरक चतुर्दशीचे महत्व समजावे या उद्देशाने मालवण मधील युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर मित्रमंडळाने यंदा आगळी वेगळी नरकासुर स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या नरकासुरांसोबत मंडळाने श्रीकृष्णाची वेषभूषा असलेले पात्र सादर करणे आवश्यक आहे. दोन गटात ही स्पर्धा होणार असून या स्पर्धेत प्रथम तीन विजेत्या क्रमांकांना रोख रक्कम, प्रमाणपत्र आणि आकर्षक भेटवस्तू दिली जाणार आहे. मागील वर्षी देखील सौरभ ताम्हणकर मित्रमंडळाने नरकासुर स्पर्धा भरवली होती. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. यंदा स्पर्धेचे दुसरे वर्ष असून यावर्षी श्रीकृष्ण महिमा ही थीम घेऊन ही स्पर्धा होणार आहे. ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ ते रात्री १२ वा. या वेळेत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

नरक चतुर्दशी निमित्त मोठमोठे नरकासूर साकारून त्यांची मिरवणूक काढली जाते. मात्र भव्य दिव्य नरकासुर साकारण्याच्या ओघात नरकासुराचा वध करणाऱ्या श्रीकृष्णाचा सर्वांनाच विसर पडतो. त्यामुळे नरक चतुर्दशीचे महत्व आजच्या युवा पिढीला समाजावे आणि यातून आपल्या संस्कृतीचे रक्षण व्हावे या उद्देशाने सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर मित्रमंडळाने यावर्षी पासून श्रीकृष्ण महिमा ही थीम घेऊन नरकासूर स्पर्धा आयोजित केली आहे.

दोन गटात होणार स्पर्धा, अशा असतील अटी शर्ती

दोन गटात ही स्पर्धा होणार आहे. लहान गटात “इको फ्रेंडली” नरकासुर असणे आवश्यक आहेत. यात नरकासुर जास्तीत जास्त ६ फुट असावा, नरकासुर सजावट इको फ्रेंडली आवश्यक आहे. या गटात फोन किंवा व्हाट्सअप द्वारे पहिल्या १० जणांना सहभाग घेणाऱ्यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. प्रत्येक मंडळा सोबत श्रीकृष्णाची वेशभूषा असणे आवश्यक असून नरकासूर देखाव्यातून व्यसनमुक्ती, प्लास्टिक मुक्ती व महिला सुरक्षिततेचे संदेश असावेत, अशा अटी ठेवण्यात आल्या आहेत. तर मोठ्या गटात नरकासुर विषयांवर आधारित असावे. हे नरकासुर जास्तीत जास्त मोठे असावे. मोठ्या गटात इको फ्रेंडलीची कोणतीही अट नाही. या गटातही प्रत्येक मंडळा सोबत श्रीकृष्णाची वेशभूषा असणे आवश्यक असून नरकासूर देखाव्यातून व्यसनमुक्ती, प्लास्टिक मुक्ती व महिला सुरक्षिततेचे संदेश असावेत, अशा अटी ठेवण्यात आल्या आहेत. तरी स्पर्धेत नाव नोंदणी करण्यासाठी सौरभ ताम्हणकर ७५८८५६४८८७ (व्हाट्सअप) किंवा ९२०९३३३०१२ (फोन) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!