पर्ससीन बोटींवर कारवाईसाठी डिसेंबर महिन्यात २० नॉटिकल वेगाची गस्तीनौका देणार
मत्स्यआयुक्त अतुल पाटणे यांची आ. वैभव नाईक यांना ग्वाही
अनधिकृत पर्ससीन बोटींवर कडक कारवाई करण्याची मागणी
मालवण : अनधिकृत मासेमारी करणाऱ्या पर्ससीन बोटींवर कारवाई करण्यासाठी मत्स्य विभागाला आवश्यक असलेली ताशी २० नॉटिकल वेग असणारी परदेशी बनावटीची गस्ती नौका डिसेंबर महिन्यात देण्याची ग्वाही राज्याचे मत्स्य आयुक्त अतुल पाटणे यांनी आमदार वैभव नाईक यांना दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्ससीन बोटींद्वारे राजरोसपणे अनधिकृत मासेमारी सुरू असून पारंपारिक मच्छीमारांच्या तोंडचा घास पळवला जात असल्याने अनधिकृत पर्ससीन बोटींवर कडक कारवाई करण्याची मागणी आ. वैभव नाईक यांनी मत्स्य आयुक्तांकडे केली आहे.
पारंपारिक मच्छिमारांना उद्भवत असलेल्या समस्या व प्रश्नांकडे मच्छीमारांनी आ. वैभव नाईक यांचे लक्ष वेधले होते. त्यासंदर्भात आज आ. वैभव नाईक यांनी मुंबई येथे राज्याचे मत्स्य आयुक्त अतुल पाटणे यांची भेट घेत पारंपारिक मच्छिमारांच्या समस्या मांडल्या. पारंपारीक मच्छीमार आपल्या न्याय हक्कासाठी दिनांक १६ नोव्हेंबर रोजी मत्स्य व्यवसाय विभाग, मालवण कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहेत. याकडे आयुक्तांचे लक्ष वेधत त्याबाबतचे निवदेनही दिले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्र किनारपट्टीवर मागील काही दिवस १२ वावच्या आत पर्ससीन बोटींद्वारे अनधिकृत मासेमारी करण्यात येत आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातील पारंपारीक मच्छीमारांवर अन्याय होत आहे. मत्स्य विभागाकडे हायस्पीड गस्ती नौका नसल्याने पर्ससीन बेटींना पकडता येत नाही. कारवाईसाठी हायस्पीड गस्ती नौकेची आवश्यकता असून लवकरत लवकर ती देण्याची मागणी आ. वैभव नाईक यांनी केली. त्यावर मत्स्य आयुक्त अतुल पाटणे यांनी ताशी २० नॉटिकल वेग असणारी परदेशी बनावटीची गस्ती नौका डिसेंबर महिन्यात देण्यात येणार असल्याची ग्वाही दिली आहे.
डिझेल परताव्याची उर्वरित रक्कम पुढील ८ दिवसांत देण्याचे केले मान्य
डिझेल परताव्याची उर्वरित रक्कम देखील देण्याची मागणी आ. वैभव नाईक यांनी मत्स्य आयुक्तांकडे केली. त्यावर पुढील ८ दिवसांत डिझेल परताव्याची उर्वरित रक्कम देखील देण्याचे त्यांनी मान्य केले आहे. मत्स्य विभागातील अपुऱ्या कर्मचारी वर्गाकडे त्यांनी लक्ष वेधत पद भरती करण्याची मागणी केली. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पारंपारीक मच्छीमारांच्या ज्या काही मागण्या आहेत, त्या पूर्ण करण्याच्या सूचना सबंधित अधिकाऱ्यांना देण्यास सांगितले.