कोकणच्या राजकारणात त्सुनामी : भाजपा नेते निलेश राणे यांची सक्रिय राजकारणातून निवृत्तीची घोषणा
ट्विट करीत स्वतः केले जाहीर ; निलेश राणेंच्या निर्णयानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यामध्ये प्रचंड अस्वस्थता
मालवण | कुणाल मांजरेकर
कोकणच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र, भाजपाचे नेते तथा माजी खासदार निलेश राणे यांनी सक्रिय राजकारणातून संन्यास घेत असल्याचे जाहीर केले आहे. निलेश राणे यांनी अलीकडे कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. त्यादृष्टीने भाजपचे कार्यकर्ते कामाला लागले होते. मात्र अचानक निलेश राणे यांनी राजकारण सोडण्याचा निर्णय घेतल्याने तळकोकणचे राजकारण ढवळून निघाले आहे.
नारायण राणेंचे ज्येष्ठ सुपुत्र असलेल्या निलेश राणे यांनी २००९ ते २०१४ या काळात काँग्रेसच्या तिकिटावर खासदारकी भूषवली होती. तर २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभव पत्कारावा लागला होता. अलीकडे २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातून त्यांना उभे करण्यासाठी प्रयत्न सुरु होते. त्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी कंबर कसली होती. असे असताना आज अचानक निलेश राणे यांनी राजकारणातून बाजूला होत असल्याचे ट्विट करीत एकच खळबळ उडवून टाकली आहे.
“नमस्कार, मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही. मागच्या १९/२० वर्षा मध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं, कारण नसताना माझ्या सोबत राहिलात त्या बद्दल मी आपला खूप आभारी आहे. BJP मध्ये खूप प्रेम भेटलं आणि BJP सारख्या एका उत्तम संघटनेत काम करण्याची संधी मिळाली त्या बद्दल मी खूप नशीबवान आहे. मी एक लहान माणूस आहे पण राजकरणात खूप काही शिकायला मिळालं आणि काही सहकारी कुटुंब म्हणून कायमचं मनात घर करून गेले, आयुष्यात त्यांचा मी नेहमी ऋणी राहीन. निवडणूक लढवणं वगैरे यात मला आता रस राहिला नाही, टीका करणारे टीका करतील पण जिथे मनाला पटत नाही तिथे वेळ स्वतःचा आणि इतरांचा वाया घालवणे मला पटत नाही. कळत नकळत मी काही लोकांना दुखावलं असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छा. जय महाराष्ट्र!” असं निलेश राणे यांनी ट्विट मधून म्हटलं आहे.