देवबागात शिवसेना ठाकरे गटाला धक्का ; माजी पं. स. सदस्या मधुरा चोपडेकर शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात !
भाजपा नेते निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश ; दत्ता सामंत यांचीही उपस्थिती
देवबाग गावातील विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही ; निलेश राणेंचा शब्द
मालवण | कुणाल मांजरेकर
भाजपचे कुडाळ – मालवण प्रभारी, माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने देवबाग गावात शिवसेना ठाकरे गटाला धक्का दिला आहे. येथील ठाकरे गटाच्या माजी पं. स. सदस्या सौ. मधुरा चोपडेकर यांनी बुधवारी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करीत भाजपात प्रवेश केला आहे. यावेळी भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांच्यासह अन्य स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. देवबाग गावात दत्ता सामंत यांच्या माध्यमातून आज विकासाचे चित्र उभे राहत आहे. त्यांनी येथील ग्रामस्थांना दिलेला विकासाचा प्रत्येक शब्द आम्ही पक्ष म्हणून कमी पडू देणार नाही. येथील विकास कामांसाठी आवश्यक निधी दिला जाईल, अशी ग्वाही श्री. राणे यांनी दिली. यावेळी सौ. चोपडेकर यांच्यासह मकरंद चोपडेकर यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला. मागील ग्रा. प. निवडणुकीपासून अलिप्त असलेले सरपंच पदाचे अपक्ष उमेदवार नादार तुळसकर हे देखील पक्ष कार्यात सक्रिय झाले.
देवबाग मधील मत्स्यगंधा थिएटर मध्ये भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख, माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश बुधवारी संपन्न झाला. यावेळी व्यासापीठावर भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत, जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर, माजी सभापती सुनील घाडीगावकर, राजा गावडे, माजी पं. स. सदस्य मधुरा चोपडेकर, देवबाग उपसरपंच घन:श्याम बिलये, स्वरा तांडेल, नादार तुळसकर, जयवंत सावंत, मकरंद चोपडेकर यांच्यासह युवा मोर्चा तालुकाध्यक्ष मंदार लुडबे, शहर अध्यक्ष ललित चव्हाण, सहदेव साळगावकर, राजू बिडये, दत्ता चोपडेकर, दिनू कासवकर, बाबू कासवकर, पंकज मालंडकर, विलास बिलये, गणेश मोंडकर, नाना तांडेल, निलेश सामंत तसेच अन्य मान्यवर, स्थानिक ग्रामस्थ आणि पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी निलेश राणे म्हणाले, देवबाग गावातील बंधाऱ्यासाठी एक ते सव्वा कोटी रुपये मागील वेळी आपण राणेसाहेबांच्या राज्यसभा खासदार निधीतून दिले होते. तेव्हा ठाकरे सरकार होते. हा विषय येथील ग्रामस्थांच्या जीवनमरणाचा प्रश्न असल्याने मी जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो, आणि त्यांना याचे महत्व पटवून दिले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या निधीला परवानगी दिली, पण मंत्रालयातून बंधारा तयार करण्यासाठी परवानगी मिळाली नाही. राणेंकडून निधी गेला तर आपले राजकीय नुकसान होईल म्हणून ठाकरे सरकार आणि तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून हा निधी अडवला गेला. त्यामुळे हे काम होऊ शकले नाही. मात्र आता केंद्रात आणि राज्यात आपलेच सरकार असून देवबाग गावातील बंधारा आपणच तयार करणार आणि राणे साहेबांच्या खासदार निधीतूनच तो करणार आहोत. आज राज्य आणि केंद्रात भाजपचे सरकार असून येत्या लोकसभा निवडणुकीत कोणीही काहीही केले तरी मोदी साहेबच निवडून येणार आहेत. आता एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह सगळेच इकडे आले आहेत. त्यामुळे आगामी काळातील राजकारण भाजपच्या अवतीभवतीच फिरणार आहे, असे ते म्हणाले. आज देवबाग गावाला जागतिक दर्जा प्राप्त झाला आहे. त्यामुळे विकासाला आम्ही निधी कमी पडू देणार आहे. तुम्ही देखील वेगळा विचार करू नका, असेही ते म्हणाले.
२०१४ पासून कुडाळ मालवण मतदार संघ ओसाड
कुडाळ मालवण मतदार संघात २०१४ ला झालेले रस्ते आजवर झाले नाहीत. हा मतदार संघ ओसाड पडला आहे. यापूर्वी आपल्या मतदार संघाला वेगळी ओळख होती. मात्र या नऊ वर्षात याठिकाणी काहीच झाले नाही. एक कारखाना आपण आणू शकलो नाही. उद्या निलेश राणे महत्वाचा नाही. पण विकास कोण करू शकतो, याचा विचार करा. पत्र देणे आणि विकास करणे यातील फरक ओळखा, असे निलेश राणे म्हणाले.
दत्ता सामंत यांना नियतीच मोठं करेल : निलेश राणे
भाजप नेते निलेश राणे यांनी दत्ता सामंत यांच्या कार्याचे कौतुक केले. या माणसाने ठरवलं असतं तर स्वतः मोठा झाला असता. पण निलेश राणेला आमदार करण्यासाठी हा ओळखून धडपडत आहे. आज देवबाग मध्ये दत्ता सामंत यांच्या माध्यमातून विकासाचे, प्रगतीचे चित्र उभे राहत आहे. त्यांनी ग्रामस्थांना दिलेला विकासाचा प्रत्येक शब्द आम्ही कमी पडू देणार नाही, असं सांगून नियती तुम्हाला १०० % मोठं केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही पक्षासाठी आणि माझ्यासाठी जे प्रयत्न करता ते व्यर्थ जाणार नाहीत. उभ्या आयुष्यात तुमचे उपकार मी विसरणार नाही, असे निलेश राणे म्हणाले.
यावेळी दत्ता सामंत म्हणाले, देवबाग मधील ठाकरे गटाच्या माजी पं. स. सदस्या मधुरा चोपडेकर, मकरंद चोपडेकर आज भाजपात प्रवेश करीत आहेत. २०२४ मध्ये निलेश राणे यांना आमदार करायचं आहे हे आम्ही सर्वांनी ठरवले आहे. २०१९ च्या लोकसभेला निलेश राणे अपक्ष उभे राहिले. त्यावेळी ७० % मतदान देवबाग मधून त्यांना झाले. या गावात प्रामाणिक कार्यकर्ते आहेत. विधायक आणि सामाजिक कामांची त्यांनी मागणी केली आहे. येथील ग्रामस्थ आजही भाजपाच्या पाठीशी आहेत. निलेश राणे यांच्या प्रयत्नातून येथे साडेतेरा कोटींचा निधी आपण मंजूर करून घेतला आहे. भाजपाची सत्ता आल्यामुळे येथील बंधाऱ्याचा प्रश्न १०० % सुटणार आहे. येथील बंधारा कम रस्त्याचा प्रश्न भाजपाच्याच माध्यमातून सुटू शकतो. येथील ट्रान्सफॉर्मरचा प्रश्न सोडवणे नऊ वर्षात आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत यांना जमले नाही. पण आम्ही काही दिवसात हा प्रश्न सोडवला. आम्ही निवडणुकीसाठी आलो नाही, लोकांचे प्रश्न सोडवायला आलो आहोत, असे सांगून २०२४ मध्ये तुम्हाला दोन आमदार मिळणार आहेत. निलेश राणे हे ओरिजनल आमदार असतील. तर मी सुद्धा विकासासाठी त्यांच्या सोबत असेन, असे सांगून निलेश राणे हे हुशार आहेत. त्यांच्या फोनला आजही मंत्रालयात किंमत आहे. त्यामुळे येथील विकासासाठी त्यांना जास्तीत जास्त मताधिक्याने विजयी करूया, असे आवाहन दत्ता सामंत यांनी केले.
यावेळी सुदेश आचरेकर यांनी आपल्या मनोगतात १९९० मध्ये देवबाग गावचे संरक्षण करण्याचे काम नारायण राणे यांनीच केल्याची आठवण करून दिली. आज देवबाग गावात मोठ्या प्रमाणात पर्यटन बहरत आहे. त्यामुळे आगामी काळात गावच्या विकासासाठी निलेश राणे यांच्यासारखा धडाकेबाज आमदार आवश्यक असल्याचे ते म्हणाले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.