आचरा ग्रा. पं. सरपंच पदासाठी भाजपाकडून जेरॉन फर्नांडिस यांच्या नावाची घोषणा
वरिष्ठांच्या मान्यतेनंतर तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी केले जाहीर ; फर्नांडिस यांच्या उमेदवारीला एकमुखी पाठींबा
दहा वर्ष आमदार असलेल्या वैभव नाईकांवर ग्रा. पं. निवडणुकीसाठी उमेदवार आयात करावे लागतात हे दुर्दैव ; चिंदरकर यांची टीका
ना. राणे, पालकमंत्र्यांसह निलेश राणेंच्या माध्यमातून गावात मोठा निधी ; दत्ता सामंत यांच्याकडूनही वैयक्तिक माध्यमातून मदत
मालवण | कुणाल मांजरेकर
आचरा ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी भाजपाने माजी जि. प. सदस्य जेरॉन फर्नांडिस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. वरिष्ठांच्या मान्यतेनंतर तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी पत्रकार परिषदेत या नावाची घोषणा केली. जेरॉन फर्नांडिस हे लोकप्रिय आणि अजातशत्रू म्हणून गावात ओळखले जातात. त्या मुळे त्यांच्या नावाला सर्वांनी एकमुखी पाठींबा दिला आहे, असे चिंदरकर म्हणाले. दरम्यान, वैभव नाईक हे दहा वर्षे आमदार आहेत, असे असताना आचऱ्यात ग्रा. पं. निवडणुकीसाठी त्यांना उमेदवार शोधावे लागतात, आयात करावे लागतात हे दुर्दैव आहे, अशी टीका धोंडू चिंदरकर यांनी केली. आचरा गावात केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी आला आहे. तर भाजपा नेते दत्ता सामंत हे देखील वेळोवेळी वैयक्तिक माध्यमातून अनेकांना मदत करीत असतात. त्यामुळे भाजपा कार्यकर्ते आणि ग्रामस्थांच्या पाठींब्यावर जेरॉन फर्नांडिस यांच्यासह भाजपचे सर्व उमेदवार विजयी होतील, असा विश्वास श्री. चिंदरकर यांनी व्यक्त केला.
आचरा येथील हॉटेल डॅफोडील येथे भाजप तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी याबाबत माहिती दिली. यावेळी खरेदी विक्री संघ अध्यक्ष राजन गावकर, माजी सभापती नीलिमा सावंत, सरपंच पदाचे उमेदवार जेरॉन फर्नांडिस, संतोष कोदे, संतोष गावकर, दीपक सुर्वे, डॉ. प्रमोद कोळंबकर, धनंजय टेमकर, चावल मुजावर, मंदार सरजोशी, अवधूत हळदणकर, रुपेश हडकर, किशोरी आचरेकर, किशोर आचरेकर, योगेश गावकर, पंकज आचरेकर, लवू घाडी, प्राजक्ता देसाई, प्रियता वायंगणकर, संतोष मिराशी, श्रुती सावंत, चंद्रकांत कदम, सायली सारंग, सारिका तांडेल, हर्षदा पुजारे, सचिन हडकर, केदार गावकर तसेच भाजपा पदाधिकारी विजय निकम, विरेश पवार उपस्थित होते. आचरा प्रभारी म्हणून संतोष गावकर यांच्याकडे जबाबदारी देण्यात आल्याची माहिती चिंदरकर यांनी दिली.
सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले लोकप्रिय व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे जेरॉन फर्नांडिस यांच्या उमेदवारीला सर्वानुमते पाठिंबा देण्यात आला. त्यानंतर वरिष्ठाशी बोलून त्यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. सरपंच निवडणूक ही थेट जनतेतून असल्याने या निवडणुकीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. सदस्य पदासाठी अनेकजण इच्छुक उमेदवार आहेत. सदस्य पदाचे उमेदवारही लवकर जाहीर केले जातील. एकत्र उमेदवारी अर्ज दाखल केले जातील. राज्यात भाजप शिवसेना मित्रपक्ष युती सरकार आहे. त्याचा विचार करता याठिकाणी युती म्हणून निवडणूक लढावण्याबाबत चर्चा सुरु आहे. वरिष्ठ याबाबत निर्णय घेतील असे चिंदरकर म्हणाले.
आचारे गावात भाजपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासनिधी देण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देश प्रगतीपथावर जात असताना गाव विकासालाही महत्व प्राधान्य दिले जात आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे पालकमंत्री रविंद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून गावविकासाला प्राधान्य देत मोठा निधी उपलब्ध केला जात आहे. भाजप प्रदेश सदस्य दत्ता सामंत यांच्या माध्यमातून अनेकांना मदत विकासकामे यांना प्राधान्य दिले जात असल्याचे धोंडी चिंदरकर यांनी सांगितले. भाजप कार्यकर्ते व आचरावासिय ग्रामस्थ यांच्या पाठिंब्यावर भाजप उमेदवार यांचा विजय निश्चित असल्याचे धोंडी चिंदरकर यांनी सांगितले.
10 वर्षे आमदार असताना वैभव नाईक यांना याठिकाणी उमेदवार शोधावे लागतात. उमेदवार मिळत नसल्याने उमेदवार आयात करावे लागतात. हे अपयश आमदार वैभव नाईक यांच्या कारभाराचे आहे. निवडणुकीतही ठाकरे गटाचा पराभव करत वैभव नाईक यांना भाजप स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते जागा दाखवून देतील. आयात उमेदवार यामुळे नाराज ठाकरे गटातील अनेकजण भाजपला पाठिंबा व्यक्त करत असल्याचा दावा धोंडू चिंदरकर यांनी व्यक्त केला आहे.