काडतुसाची बंदूक बेकायदेशीरपणे नातेवाईकाला बाळगण्यासाठी दिल्याप्रकरणी दोघांची निर्दोष मुक्तता
संशयीत आरोपींच्या वतीने ॲड. स्वरूप नारायण पई यांचा युक्तिवाद
मालवण : स्थानिक गुन्हा अनोषण शाखा ओरोस यांनी मालवण तालुक्यातील काळसे येथील मोहन विजय चुडनाईक यांच्या घरातून १२ मार्च २०१९ रोजी मारलेल्या छाप्यामध्ये निर्भय राजाराम मयेकर (वय ४७ वर्षे, रा. दत्तनगर, सावंतवाडी) यांची परवान्याची १२ बोअर काडतुसाची बंदुक जप्त केली होती. या प्रकरणी दोन्ही आरोपीविरुध्द गुन्हा दाखल केला होता. याची सुनावणी पूर्ण होऊन मालवण येथील मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्री. ए. डी. तिडके यांनी मोहन विजय चूडनाईक व निर्भय राजाराम मयेकर यांची या गुन्हयातुन सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. आरोपीतर्फे ॲड. स्वरूप नारायण पई यांनी काम पाहिले.
याबाबत पोलीसांनी आरोपींच्याविरुध्द १२ एप्रिल २०१९ रोजी मालवण पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम कलम ३ व २५ अन्वये गुन्हा दाखल केला होता. पोलीसांनी आरोपीविरूध्द तपासकाम करून मे. प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी मालवण यांचे न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केलेले होते. याकामी सरकार पक्षातर्फे एकूण ४ साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादीचे व साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती, तपासकामातील त्रुटी व आरोपीतर्फे करण्यात आलेला युक्तीवाद विचारात घेऊन मालवण येथील मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.