सुदेश आचरेकर आणि सहकाऱ्यांची तत्परता ; अन् मोठा अनर्थ टळला…!
मालवण | कुणाल मांजरेकर
भाजपाचे स्थानिक नेते, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक गणेश कुशे, सौ. ममता वराडकर, मोहन वराडकर, बाळू तारी यांच्या तत्परतेमुळे मालवणात मोठा अनर्थ टळला आहे. शहरातील रघुनाथ देसाई हायस्कुल नजिक असलेल्या ट्रान्सफॉर्मर कडील ११ केव्हीची भूमिगत विद्युत वाहिनी ब्रेक झाल्याचा प्रकार येथील नागरिकांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर श्री. आचरेकर आणि सहकाऱ्यांनी तात्काळ वीज वितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करीत संपर्क साधून या विद्युत वाहिनीची दुरुस्ती करून घेतली. अन्यथा येथे मोठा अनर्थ घडण्याची शक्यता निर्माण झाली होती.
मालवण शहरात काही भागात भूमिगत विद्युत वाहिनीचे काम करण्यात आले आहे. शहरातील रघुनाथ देसाई हायस्कुल ते दैवज्ञ भवन नजिक असलेल्या ट्रान्सफॉर्मर कडील भूमिगत विद्युत वाहिनी ब्रेक झाल्याचे येथील स्थानिक नागरिक आप्पा मोरजकर, विनायक मोरजकर, नितेश पेडणेकर, प्रथमेश आढाव, दीपक आढाव, राजू वाघ, पिंटू आढाव, रंजन आढाव आदींनी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक गणेश कुशे, सौ. ममता वराडकर, मोहन वराडकर, बाळू तारी आदींच्या निदर्शनास आणून दिले. याठिकाणी ११ केव्हीची वाहिनी ब्रेक झाल्याने शॉक लागून जनावरे दगावण्याचा धोका निर्माण झाला होता. तसेच मनुष्यहानी होण्याची भीती असल्याने श्री. आचरेकर आणि सहकाऱ्यांनी वीज वितरणचे सहाय्यक अभियंता श्री. भुजबळ यांच्याशी संपर्क साधून त्यांना घटनास्थळी बोलावून घेत येथील गांभीर्य निदर्शनास आणून दिले. त्यानंतर तात्काळ या वीज वाहिनीची दुरुस्ती करण्यात आली. यामुळे मोठा अनर्थ टळला.
वीज वितरणने सर्व भूमिगत वाहिन्यांची तपासणी करावी : सुदेश आचरेकर
मालवण शहरातील काही भागात वीज वितरण कंपनीकडून भूमिगत वीज वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. आज दैवज्ञ भवन नजिक ११ केव्हीची वाहिनी ब्रेक झाल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आल्यामुळे येथील दुरुस्ती तातडीने करण्यात आली. त्यामुळे मोठा धोका टळला. त्यामुळे शहरातील राजकोट, मेढा, धुरीवाडा, दांडी भागात विद्युत वाहिनीची महावितरणने पाहणी करून त्रुटी दूर कराव्यात. अशी मागणी सुदेश आचरेकर यांनी केली आहे.