चौके गोड्याचीवाडी हादरली ; युवा व्यावसायिकाचा वीजेचा धक्का लागून मृत्यू
पत्नीलाही वीजेचा धक्का ; सुदैवाने बचावली ; परिसरात हळहळ
मालवण : मालवण तालुक्यातील चौके – गोड्याचीवाडी येथील युवा व्यावसायिक राजकमल वामन गावडे (३६) या युवकाचा घरापासून काही अंतरावर असलेल्या पंपाच्या थ्री फेज वायरची दुरुस्ती करताना वीजेचा धक्का बसल्याने जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना रविवारी सकाळी घडली.
चौके- गोड्याचीवाडी येथे वराहपालनाचा व्यावसाय करणारा युवा व्यावसायिक राजकमल वामन गावडे हा रविवारी सकाळी ८.४५ वाजण्याच्या सुमारास चहापाणी करुन घरापासून काहीश्या अंतरावर असलेल्या वराहपालन शेडमध्ये पाणी सोडायला गेला. मात्र पंपाने पाणी येत नसल्याने शेडच्या मागे पंपाच्या तुटलेल्या वायरला जोडताना त्याला जोरदार धक्का बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. दुपारपर्यंत राजकमल घरी न आल्याने त्याच्या फोनवर पत्नीचे वारंवार फोन केले. मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यांच्या घरात वृध्द वडील राजकमल यांचा तीन वर्षाचा मुलगा व पत्नी चार महिन्यांनी गरोदर होती. राजकमल घरी न आल्याने अखेर पत्नी ३.३० वाजता शोधण्यासाठी गेली असता राजकमल उलटा पडलेला दिसला. राजकमलला उठवायला गेलेल्या पत्नीलाही विजेचा धक्का लागला. मात्र सुदैवाने ती वाचली. यानंतर सदर घटना घरी येत सांगताच वाडीतील ग्रामस्थानी घटनास्थळी धाव घेत चालू विद्युत पुरवठा बंद केला. यानंतर पोलीस पाटील राजू गावडे यांना कल्पना दिली. पोलीसपाटील यांनी मालवण पोलीस ठाणे यांना माहिती दिली. मालवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल जाधव, सुभाष शिवगण, अजय येरम, डी. व्ही. जानकर यांनी घटनास्थळी येत पंचनामा करुन तपास करत आहेत. यावेळी वैद्यकीय अधिकारी कुबेर मिठारी यांच्यासह,चौके सरपंच गोपाळ चौकेकर, राजा गावडे, संतोष गावडे, पापा मांडलकर तसेच गोड्याचीवाडी ग्रामस्थ, चाकरमानी यांनी घटनास्थळी धाव घेतली. याघटनेने ऐन चतुर्थी सणाला अवघा दोन दिवस असताना चौके गोड्याचीवाडी परिसर शोकाकूल झाला. रविवारी सायंकाळी उशीरा अंत्यसंस्कार करण्यात आले.
चौके गोड्याचीवाडी येथील वामन गावडे हे शेतकरी कुटुंब. वामन गावडे हे आजारपण व वृध्दापकाळाने ग्रस्त झाले आहेत. गतवर्षी पत्नीचे आजारपणात निधन झाले होते. त्यांच्या पश्चात त्यांचा मोठा मुलगा विवाहित राजकमल यांने शेतीबरोबरच अनेक व्यावसाय केले. गेली काही वर्षे तो वराहपालनाचा व्यवसाय करत होता. चौकेसह मालवण तालुक्यात व्यवसायामुळे त्यांची ओळख होती. राजकमल याला तीन वर्षाचा लहान मुलगा असून पत्नी गरोदर आहे. ऐन चतुर्थी सणाच्या तोडांवर आकस्मित दुर्दैवी मृत्यू झाल्याने कुटुबांवर मोठा आघात झाला आहे.