सण आलाय हो आलाय नारळी पुनवेचा….
शिवकालीन नारळी पौर्णिमेनिमित्त मालवणच्या किनाऱ्यावर उसळला जनसागर
भाजपा नेते निलेश राणे, दत्ता सामंत, आमदार वैभव नाईक यांच्यासह दिग्गजांची उपस्थिती
व्यापाऱ्यांसह मच्छिमार बांधवानी दर्याराजाला शांत होण्यासाठी घातले साकडे
मालवण | कुणाल मांजरेकर
शिवकालीन परंपरा लाभलेला मालवण येथील नारळी पौर्णिमा उत्सव बुधवारी मालवण बंदर जेटी येथील समुद्र किनाऱ्यावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शेकडो वर्षांची ऐतिहासिक परंपरा जोपासत हजारो नागरिकांनी या सोहळ्याला उपस्थिती दर्शविली. भाजपाचे नेते, माजी खासदार निलेश राणे, दत्ता सामंत, ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मालवणसह जिल्हावासियांनी या सोहळ्यानिमित्ताने उपस्थिती दर्शवली. सिंधुदुर्ग किल्ल्यावरून मानाचा नारळ सागराला अर्पण झाल्यानंतर व्यापारी संघाचा नारळ समुद्राला अर्पण करण्यात आला. त्यानंतर शेकडो मालवण वासियांनी आपापले नारळ समुद्राला वाहिले.
मालवण येथील नारळी पौर्णिमेला शिवकालीन परांपरा आहे. व्यापारपेठ आणि मच्छिमारांच्या दृष्टीने देखील या नारळी पौर्णिमेचे अनन्यसाधारण महत्व असल्याने मच्छीमार आणि व्यापारी मोठ्या संख्येने या सोहळ्यानिमित्त मालवणच्या बंदर जेटीवर उपस्थिती दर्शवितात. पारंपरिक प्रथेप्रमाणे सिंधुदुर्ग किल्ल्यावरील सोन्याचा नारळ सागराला अर्पण केल्या नंतर मालवण व्यापारी संघाच्या वतीने विधिवत पूजन केलेला नारळ सागराला अर्पण केला जातो. आणी त्यानंतर या नारळी पौर्णिमेला सुरुवात होते. दुपारी मालवणच्या बाजारपेठेतील श्री हनुमान मंदिरात व्यापारी संघाच्या वतीने नारळाची विधिवत पूजा करून त्यानंतर वाजत गाजत हा नारळ मालवण बंदर जेटीवर आणण्यात आला. याठिकाणी मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरूरकर यांच्या हस्ते मानाच्या नारळाचे पूजन करण्यात आले.
शिवकालीन परंपरेनुसार सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात गाऱ्हाणे झाल्यानंतर शिवराजेश्वर मंदिरातून सोन्याचा मुलामा लावलेला नारळ ढोलताशे आणि नौबतीसह किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या किनारी आणून त्या श्रीफळाचे पुजन करण्यात आले आणि त्यानंतर हा नारळ समुद्राला अर्पण करण्यात आला. या मानाचा नारळ सागराला अर्पण झाल्याचा संदेश मिळाल्यानंतर सायंकाळी ५ वाजता मालवण व्यापारी संघ अध्यक्ष उमेश नेरुरकर यांच्या हस्ते सोनेरी मुलामा दिलेला नारळ विधिवत पूजा करून सागराला अर्पण करण्यात आला. यावेळी भाजपा नेते निलेश राणे, आमदार वैभव नाईक, दत्ता सामंत, धोंडू चिंदरकर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब, हरी खोबरेकर, मंदार ओरसकर, अमित भोगले, रवी तळाशिलकर, नितीन वाळके, बाळू अंधारी, नितीन तायशेटये, नाना पारकर, विजय केनवडेकर, जॉन नरोन्हा, परशुराम पाटकर, आप्पा लुडबे, राजू बिडये, ललित चव्हाण, महेश सारंग, सुशांत घाडीगावकर, मंदार लुडबे, महेश जावकर, अरविंद मोंडकर, गणेश प्रभुलीकर, हर्षल बांदेकर, विजय नेमळेकर, सौरभ ताम्हणकर, सहदेव बापार्डेकर, सत्यवान चव्हाण यांच्यासह अन्य व्यापारी प्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मच्छिमार बांधवांच्या वतीनेही किनारपट्टीवरून सागराला श्रीफळ अर्पण करत नव्या मासेमारी हंगामाचे साकडे दर्या राजाला घालण्यात आले.
भाजपा नेते निलेश राणे, पोलीस निरीक्षकांच्या हस्तेही पूजन
मालवण व्यापारी संघाच्या मानाच्या नारळाचे व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरूरकर यांच्या हस्ते पूजन झाल्यानंतर भाजपचे नेते माजी खासदार निलेश राणे आणि पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या हस्ते देखील या नारळाचे पूजन करण्यात आले. यावेळी मालवणच्या भरभराटीसाठी सागराला गाऱ्हाणे घालण्यात आले.
महिलांच्या नारळ लढवण्याच्या स्पर्धेला प्रतिसाद
नारळी पौर्णिमे निमित्त बंदर जेटीवर सौ. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळ आणि मालवणी संस्कृती व वारसा मंडळ यांच्यावतीने महिलांसाठी नारळ लढवण्याच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. सौ. खोत यांच्या स्पर्धेचे उदघाटन आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. तर मालवणी संस्कृती व वारसा मंडळाच्या स्पर्धेचे उदघाट्न माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते आणि काँग्रेसच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी यांच्या हस्ते झाले. या दोन्ही स्पर्धाना महिलांनी गर्दी केली होती.
पर्यटन व्यवसायिक महासंघाच्या वतीने रिक्षांची रॅली
पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या वतीने नारळी पौर्णिमेनिमित्त रिक्षांची रॅली काढण्यात आली. या रॅली मध्ये मोठ्या संख्येने रिक्षा व्यावसायिक सहभागी झाले होते. यावेळी संस्थेचे पदाधिकारी बाबा मोंडकर, अवी सामंत, शेखर गाड, मंगेश जावकर, संतोष लुडबे, पप्या कद्रेकर, राजा मांजरेकर आदींचा समावेश होता.
दर्याला शांत होण्यासाठी मच्छिमारांचे साकडे
राज्याचा मत्स्य हंगाम १ ऑगस्ट पासून सुरु होत असला तरी नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ अर्पण केल्यानंतरच समुद्र शांत होतो, अशी मच्छिमारांची भावना आहे. त्यामुळे बुधवारी मच्छिमारांनी समुद्राला नारळ अर्पण करून शांत होण्याचे साकडे घातले.