मालवणच्या नारळी पौर्णिमेत निलेश राणेंची “क्रेझ” ; काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या व्यासपीठावर सन्मान….

मालवणी संस्कृती व वारसा मंडळाच्या नारळ लढवण्याच्या स्पर्धेचे निलेश राणेंच्या हस्ते उदघाट्न

व्यापारी संघाच्या मानाच्या नारळाचे पूजन करण्याचा निलेश राणेंना सन्मान ; पर्यटन व्यावसायिक महासंघाचा श्रीफळ राणेंच्या उपस्थितीत सागराला अर्पण

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवणची शिवकालीन नारळी पौर्णिमा बुधवारी सायंकाळी बंदर जेटीवर हजारो नागरिकांच्या गर्दीत संपन्न झाली. या नारळी पौर्णिमेत भाजपचे कुडाळ मालवण प्रभारी, माजी खासदार निलेश राणे यांची क्रेझ पाहायला मिळाली. राष्ट्रीय काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा भरणा असलेल्या मालवणी संस्कृती व वारसा मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महिलांच्या नारळ लढवण्याच्या स्पर्धेचे उदघाट्न करण्याचा मान निलेश राणे यांना देण्यात आला. तर व्यापारी संघाच्या वतीने सागराला अर्पण करण्यात आलेल्या मानाच्या श्रीफळाचे पूजन करण्याचा मान व्यापारी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी निलेश राणे यांनाही दिला. पर्यटन व्यवसायिक महासंघाच्या वतीने नारळी पौर्णिमेनिमित्त शहरात रिक्षांची रॅली काढण्यात आली. यानंतर महासंघाच्या वतीने सागराला अर्पण करण्यात येणारा श्रीफळ निलेश राणे यांच्या उपस्थितीत सागराला अर्पण करण्यात आला. व्यापारी संघाच्या कबड्डी स्पर्धेचे उदघाट्न देखील यावेळी निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले.

भाजपाचे माजी खासदार निलेश राणे सध्या कुडाळ मालवण मतदार संघात सक्रिय झाले आहेत. या दोन तालुक्यातील दौऱ्यात तरुणाईत त्यांची निर्माण झाल्याचे दिसून येते. मालवणच्या नारळी पौर्णिमेमध्ये निलेश राणेंच्या नेतृत्वाची विरोधी पक्षावर देखील छाप असल्याचे पाहायला मिळाले.

राष्ट्रीय काँग्रेसचे २०१९ मधील कुडाळ मालवण विधानसभेचे उमेदवार तथा जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर यांच्या नेतृत्वाखाली मालवणात मालवणी संस्कृती आणि वारसा मंडळ नावाने संस्था चालवली जाते. या संस्थेवर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा भरणा आहे. या संस्थेच्या वतीने महिलांसाठी नारळ लढवण्याची स्पर्धा घेण्यात येते. यंदा या स्पर्धेचे उदघाटन करण्याची विनंती श्री. मोंडकर यांनी भाजपा नेते निलेश राणे यांना दिली. विशेष म्हणजे महाविकास आघाडी मधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक हे यावेळी बंदर जेटीवर उपस्थित होते. मात्र काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या मंडळाने निलेश राणे यांना उदघाट्न करण्याचा बहुमान देत निलेश राणे यांची क्रेझ विरोधी पक्षावर देखील असल्याचे दाखवून दिले. यावेळी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ. साक्षी वंजारी यांच्या हस्ते निलेश राणे यांचा कल्पवृक्ष देऊन विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, भाजप तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, महिला तालुकाध्यक्ष पूजा करलकर, दीपक पाटकर, सौरभ ताम्हणकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. या उदघाट्नाची चर्चा मालवणात रंगली होती.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!