भाजपात सुरु असलेल्या जोरदार इनकमिंगमुळे खोबरेकरांच्या पायाखालची वाळू घसरतेय…

भाजपाचे भटके विमुक्त आघाडी उपाध्यक्ष बाळा गोसावी यांची टीका ; कुडाळ – मालवणचा आमदार भाजपचा अन् गुलालही भाजपाचाच…

मालवण | कुणाल मांजरेकर

शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या तालुकाध्यक्षांनी भाजपमध्ये काय चाललंय, कोण कोणाविरुद्ध कुटील डाव करतो याचा शोध लावण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी काम करावे. सध्या माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपात पक्ष प्रवेश मोठ्या जोरात चालू असल्यामुळे खोबरेकरांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच खोबरेकर मालवणमध्ये सैरभर झाल्याची टीका भाजप भटके विमुक्त आघाडी उपाध्यक्ष तथा जिल्हा प्रभारी बाळा गोसावी यांनी केली आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी भाजपच्या नेत्यांवर टीका केली होती. त्यांच्या टीकेला बाळा गोसावी यांनी उत्तर दिले आहे. शिवसेना ठाकरे गटाने मालवण कुडाळमध्ये आपल्या पक्षाचे अस्तित्व टिकवावे, भाजपमध्ये काय चालले आहे त्यात ढवळाढवळ करू नये. तसेच भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची चिंता करू नये. २०२४ ला इथून भाजपचा आमदार निवडून येणार आणि भाजपच गुलाब उधळणार यात तीळमात्र शंका नाही. मालवण कुडाळमध्ये विकास झाला असे खोबरेकर म्हणाले. मग या विधानसभा मतदारसंघातील धनगर वस्त्या अजूनही का विकसित झाल्या नाहीत ? अजून त्यांच्या वाडीवस्तीवर रस्ते का पोचले नाहीत ? मेल्यानंतर जाळण्यासाठी स्मशानभूमी देखील काही ठिकाणी मिळाली नाहीत. अजून त्यांना दैनंदिन जीवनामध्ये अडचणींचा सामना करावा लागतो. साडेसात वर्ष सत्तेतील आमदार असून सुद्धा विद्यमान आमदार मालवण तालुक्याचा विकास करण्यास निष्क्रिय ठरलेले आहेत. त्यामुळे निश्चितपणाने यावेळी अमुलाग्र बदल होऊन भाजपचाच आमदार निवडून येईल. त्यामुळे शिवसेना उद्धव गटाच्या तालुका अध्यक्षांनी आपला पक्ष वाढीसाठी प्रयत्न करावेत. भाजपमध्ये काय चाललय त्या ठिकाणी डोकावून पाहू नये. पुन्हा आमच्या नेत्यांवरती टीका केल्यास जशास तसे उत्तर देऊ असा थेट इशाराही बाळा गोसावी यांनी खोबरेकरांना दिला आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3839

Leave a Reply

error: Content is protected !!