काचेच्या घरात राहणाऱ्यांना आमच्या समस्या कशा कळणार ?
नवनाथ झोरे यांचा बाळा गोसावींवर पलटवार ; वैभव नाईकांमुळेच माझ्या सारखा धनगर समाजाचा सर्वसामान्य कार्यकर्ता ग्रा. पं. सदस्य बनू शकला
मालवण | कुणाल मांजरेकर
आमदार वैभव नाईक यांच्यामुळेच आमच्या धनगर समाजाचा माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता आज ग्रामपंचायत सदस्य बनू शकला. धनगर समाज जिल्हा उपाध्यक्ष म्हणून मी माझ्या समाजाची कामे वैभव नाईक यांच्याकडे पाठपुरावा करून त्यातून ती मार्गी पण लागत आहेत. काचेच्या घरात राहणाऱ्या लोकांना आमच्या समस्या कश्या कळणार ? असा सवाल देवली ग्रा. पं. सदस्य नवनाथ झोरे यांनी करीत भाजपाच्या भटके विमुक्त आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष बाळा गोसावी यांचा समाचार घेतला आहे.
बाळा गोसावी यांनी काल शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्यावर टीका केली होती. त्याला नवनाथ झोरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आमच्या समस्या व त्याचे निराकरण करण्याचे काम मी आणि माझा शिवसेना पक्ष करण्यास समर्थ आहोत. हरी खोबरेकर हे वाळूतच जन्मलेले आहेत. सरकत्या वाळूत कसे उभे राहायचे हे तुम्ही हरी खोबरेकर यांना शिकवू नये. भाजपचे बाळा गोसावी यांचे असे झालंय की ”उथळ पाण्याला खळखळाट फार” आलिशान घरात बसून सैरभैर मन:स्थितीत वायफळ बडबड ते करीत आहेत. येणाऱ्या काळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली धनगर समाजाच्या विकासाला गती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे नवनाथ झोरे यांनी म्हटले आहे.