ठाकरे गटाने वचपा काढला ; एकाच्या बदल्यात तीन “राणे समर्थक” माजी नगरसेवक फोडले !

लीलाधर पराडकर, बाबू कांदळकर, सौ. संतोषी कांदळकर या तीन माजी नगरसेवकांसह भाजपच्या वॉर्ड अध्यक्ष अंजली पराडकर यांचा कार्यकर्त्यांसह ठाकरे शिवसेनेत प्रवेश

दांडी हा शिवसेनेचा अभेद्य बुरुज ; छोट्या मोठ्या धक्क्यांनी या बुरुजाची कपची सुद्धा निघणार नाही : सेना पदाधिकाऱ्यांचे प्रत्त्युत्तर

मालवण | कुणाल मांजरेकर

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दांडी येथील माजी नगरसेवक पंकज सादये यांना फोडत ठाकरे गटाला हादरा देणाऱ्या भाजपाला ठाकरे गटाने दोनच दिवसात जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. एका माजी नगरसेवकाच्या बदल्यात “राणे समर्थक” तीन माजी नगरसेवकांना फोडत ठाकरे गटात प्रवेश देण्यात आला आहे. या माजी नगरसेवकांमध्ये लीलाधर पराडकर, संतोष उर्फ बाबू कांदळकर, सौ. संतोषी कांदळकर यांचा समावेश असून भाजपच्या वॉर्ड अध्यक्ष अंजली लीलाधर पराडकर यांनीही कार्यकर्त्यांसह ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला आहे. आमदार वैभव नाईक, शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश संपन्न झाला. दांडी भाग हा स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना मानणारा आहे. इथे दगडालाही शेंदूर फासला जातो. पण शेंदूर फासला म्हणून त्यात देवपण येतेच असे नाही. एखादा माजी नगरसेवक गेला म्हणून शिवसेनेला फरक पडणार नाही. दांडी हा शिवसेनेचा अभेद्य बुरुज असून अशा छोट्या मोठ्या धक्क्यांनी या बुरुजाची कपची सुद्धा हलणार नाही, असे प्रत्युत्तर ठाकरे शिवसेनेकडून देण्यात आले आहे. या पक्ष प्रवेशानंतर फटाक्यांच्या आतिषबाजीत शिवसैनिकांनी जल्लोष केला.

शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक पंकज सादये यांनी गुरुवारी भाजपा नेते निलेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला होता. याची सव्याज परतफेड शिवसेनेकडून शनिवारी करण्यात आली. राणे समर्थक म्हणून ओळखले जाणाऱ्या तीन माजी नगरसेवकांना आज ठाकरे गटात प्रवेश देण्यात आला. यावेळी आमदार वैभव नाईक, शिवसेना नेते संदेश पारकर यांच्यासह तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नितीन वाळके, शहरप्रमुख बाबी जोगी, यतीन खोत, मंदार ओरस्कर, महेश जावकर, गणेश कुडाळकर, सेजल परब, उमेश मांजरेकर, उमेश चव्हाण, पूनम चव्हाण, स्वप्नील आचरेकर, निना मुंबरकर, अन्वय प्रभू, यशवंत गावकर, मंदार गावडे, श्वेता सावंत, नंदा सारंग, महेंद्र म्हाडगुत, नरेश हुले, राजा शंकरदास, सन्मेष परब, बंड्या सरमळकर, सिद्धेश मांजरेकर, समीर लब्दे, सदा लुडबे, किरण वाळके, दीपा शिंदे, गौरव वेर्लेकर, तृप्ती मयेकर, निनाक्षी शिंदे, सुर्वी लोणे, अंजना सामंत, माधुरी प्रभू, दादा पाटकर, सचिन गिरकर, पॉली गिरकर, सोमा लांबोर, रोशन कांबळी, करण खडपे, चंदू खोबरेकर, बाबू वाघ, भाई चोपडेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

आजच माझी भाऊबीज, हीच माझी ओवाळणी !

शिवसेनेच्या माजी नगरसेविका सेजल परब यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली. लीलाधर हा माझा मानलेला भाऊ. मी शिवसेनेत तर लीला हा राणेंच्या गोटात कार्यरत होता. त्यामुळे आमच्या नात्यात काही फरक पडला नसला तरी तू तुझ्या भावाला निवडून आणू शकत नाहीस, अशा शब्दात मला चिडवलं जायचं. आज माझा भाऊ माझ्या पक्षात आला, त्यामुळे आजचा दिवस माझ्यासाठी खास आहे. हीच माझी ओवाळणी असेल आणि हीच माझ्यासाठी भाऊबीज आहे. लीला तुला काहीही कमी पडू देणार नाही, असं सांगून दांडी हा शिवसेनेचा बालेकिल्लाच आहे. आमच्यातील एकजण तिकडे गेला त्या घटनेला दोन दिवस झाले नाहीत तोपर्यंत लीला इकडे आला, असं सौ. परब म्हणाल्या.

यावेळी आमदार वैभव नाईक यांनी लीलाधर पराडकर आणि बाबू कांदळकर यांना शिवसेना पक्षात योग्य तो मान सन्मान देण्याची ग्वाही दिली. लीलाधर पराडकर यांनी आम्हाला स्वतः संपर्क करीत पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली. आज शिवसेनेकडे नाव नाही, चिन्ह नाही, तरीपण सर्वजण आज आमच्या पक्षात येत आहेत. हीच शिवसेनेची ताकद आहे. कोरोना काळात उद्धव ठाकरे यांनी केलेले काम सर्वानी पाहिलं आहे. तोक्ते वादळावेळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठ्या प्रमाणात मदत मिळवून दिली हे लोक विसरलेले नाही. त्यामुळे जाणाऱ्यांना थांबवू नका. येणाऱ्यांचं स्वागत करा. हे उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. आज शिवसेनेकडे काहीही नसताना शिवसेनेचे ११ खासदार निवडून येतील आणी विधानसभेत महाविकास आघाडीचे २०० पेक्षा जास्त आमदार निवडून येतील असा सर्वे आहे. म्हणून हे सरकार निवडणुका घेत नाही, असे आ. नाईक म्हणाले. येत्या डिसेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंधुदुर्ग किल्ल्यावर येत आहेत. त्यांचे आम्ही स्वागतच करू. पण किल्ल्यावर पाणी, लाईटच्या कामासाठी ठाकरे सरकारने १० कोटी मंजूर केले होते. मात्र आताच्या सरकारने या निधीला स्थगिती दिली. त्या कामावरील स्थगिती उठवावी, अशी मागणी त्यांनी केली. मागील नगरपालिका निवडणुकीत लोकांनी ज्या विश्वासाने आमच्या ताब्यात न. प. दिली, त्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ दिला नाही. १५ वर्षात झाली नाही, एवढी कामे ५ वर्षात झाली.

“त्यांना” आमच्या शुभेच्छा !

“जे आमच्यातून गेले त्यांना शुभेच्छा” अशा शब्दात आमदार वैभव नाईक यांनी पंकज सादये यांचे नाव न घेता प्रतिक्रिया दिली. कोणी गेले म्हणून पक्ष थांबणार नाही. उलट त्यांच्या जाण्याने जागा रिकामी झाली. या जागेवर उद्या नवीन चेहऱ्याला संधी मिळेल. लिलाने आजवर अनेकांना मदत केली आहे. असे कार्यकर्ते शिवसेनेला हवे आहेत, असे आ. नाईक म्हणाले.

यावेळी शिवसेना नेते संदेश पारकर म्हणाले, मालवण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. येथील जनता बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर प्रेम करणारी आहे. काल आमच्यातील एक गेला. आज त्यांचे तीन माजी नगरसेवक आणले. वैभव नाईक यांच्या सारखे नेतृत्व आज मालवणला मिळाले आहे. परमेश्वर देखील माझा पराभब करू शकत नाही असा अहंकार झालेल्या नारायण राणे यांना अस्मान दाखवण्याचे काम वैभव नाईक यांनी करून दाखवले. उद्याच्या विधानसभा निवडणुकीत वैभव नाईक विजयाची हॅट्रिक करणारच आहेत. त्यावेळी पुन्हा एकदा महाविकास आघाडीची सत्ता येऊन जिल्ह्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून वैभव नाईक असतील. विरोधी पक्षात असताना देखील ते विकास कामासाठी फिरत आहेत. मग सत्ता आल्यावर विकासासाठी ते निधी कमी पडू देणार नाहीत. वैभव नाईक यांच्या समोर निलेश राणे उमेदवार असले तर वैभव नाईक यांची आणखी दहा हजार मते आपसूकच वाढतील. आणि ते किमान ४० हजाराने विजय मिळवतील, असे सांगून कोणतीही निवडणूक आली की नारायण राणे, नितेश राणे आणि आता निलेश राणे… राणेंशिवाय अन्य उमेदवार जिल्ह्यात जन्माला आले नाहीत का ? सत्ता स्वतःकडे ठेवण्याचा हा राणे कुटुंबियांचा प्रयत्न असल्याचा आरोप संदेश पारकर यांनी केला. यावेळी हरी खोबरेकर, नितीन वाळके, सेजल परब, पूनम चव्हाण यांनी विचार मांडले.

पराडकर, कांदळकर यांच्यासह कार्यकर्त्यांचा प्रवेश

लीलाधर पराडकर, बाबू कांदळकर दाम्पत्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी यावेळी शिवसेनेत प्रवेश केला. यामध्ये डिकू फर्नांडिस, बुवा फर्नांडिस, पॉली डिसोजा, लुसो फर्नांडिस, रॉबर्ट काळसेकर, अंतोंन काळसेकर, कौशिक खवणेकर, वैभव नागवेकर, बॉनी काळसेकर, मिल्टन काळसेकर, प्रमोद जोशी, भरत सारंग, किशोर सातोस्कर, बंड्या सावजी, भाऊ आचरेकर, भाऊ मालंडकर, बबन तांडेल, संदीप मंडलिक, शशांक माने, शीतल तारी, नामदेव केळूसकर, प्रमोद तांडेल, निलेश आचरेकर, प्रकाश डिचवलकर, भाई मालंडकर, लुईस फर्नांडिस, व्हिक्टर फर्नांडिस आदींचा समावेश आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3529

Leave a Reply

error: Content is protected !!