हडीत वाळू उपसा करणाऱ्या १२ परप्रांतीय कामगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई

पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांची माहिती ; संबंधितांना मूळ गावी जाण्याची समज

मालवण : अनधिकृत वाळू उपसा प्रकरणी कारवाईनंतर वाळू उत्खनन करणारे कामगार व बेकायदेशीर झोपड्यांवर कारवाईचे आदेश तहसीलदारांनी दिल्यानंतर पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने हडीतील १२ परप्रांतीय कामगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. त्याचबरोबर त्यांना आपल्या मूळ गावी परतण्याची समजही देण्यात आली आहे.

कालावल खाडीपात्रात अनधिकृत वाळू उपसा सुरू असल्याच्या स्थानिक ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर महसूल व पोलीस प्रशासनाने धडक कारवाईची मोहीम हाती घेत आज सकाळी ४ नौकांवर कारवाई केली. यावेळी तहसीलदार वर्षा झालटे यांनी वाळू उपसा करणारे कामगार, बेकायदेशीर झोपड्या यावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस प्रशासनास दिले. त्यानुसार पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक श्री. जाधव, हेमंत पेडणेकर, सुशांत पवार, विश्वास पाटील यांच्या पथकाने हडी येथे जात १२ परप्रांतीय कामगारांना चौकशीसाठी ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले. त्यांच्याकडून अधिक माहिती घेण्याबरोबरच त्यांची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का ? याबाबत संबंधित राज्याच्या पोलिसांकडे त्यांची माहिती पाठविण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. या सर्व कामगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करत त्यांना त्यांच्या मूळ गावी परत जाण्याची समज देण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3529

Leave a Reply

error: Content is protected !!